प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित :

भुसावळ (प्रतिनिधी)-:
येथील कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य व ललवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वंडर सेवन संस्थेतर्फे नुकताच ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित २३ व्या अखिल भारतीय प्रतिभा महासंमेलनात हा भव्य पुरस्कार सोहळा पार पडला.

या प्रसंगी कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक ॲड. डॉ. क्रांती महाजन यांनी प्रा. डॉ. ललवाणी यांच्या जीवनप्रवासाचा गौरव करताना सांगितले की, अत्यंत संघर्षशील परिस्थितीतून वाटचाल करत प्रामाणिकपणा, निष्ठा व कठोर परिश्रमाच्या बळावर त्यांनी शैक्षणिक, सामाजिक व मानवी मूल्यांची सेवा केली. असामान्य कार्य करूनही स्वतःला सामान्य समजणारे, शब्दाला जागणारे व अहोरात्र कार्यरत असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी होत.

सेवानिवृत्तीनंतर आलेल्या कठीण प्रसंगातूनही त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे नव्याने उभारी घेतली. शेतकरी, गोसेवक, उद्योजक अशा विविध भूमिका निभावत एका छोट्याशा गावात जंगलातून नंदनवन निर्माण केले. निसर्ग, प्राणी व पक्ष्यांप्रती निस्वार्थ सेवाभाव ठेवत साधे जीवन व उच्च विचार यांचा आदर्श त्यांनी जपला आहे.

हा पुरस्कार श्रीमंत मुधोजीराजे भोसले, नागपूरच्या भोसले राजघराण्याचे वारसदार, तसेच सुभेदार कुणाल मालुसरे, छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सेनानी तानाजी मालुसरे यांचे वंशज, यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. दोन मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सोहळा अधिकच अविस्मरणीय ठरला.

या कार्यक्रमास सेवानिवृत्त प्रा. डॉ. पंढरीनाथ रोकडे, वाराणसीच्या अग्रसेन विद्यापीठाच्या प्रा. रुपाली वशिष्ठ (भारत सुंदरी २०२५), हिंदुस्तान स्काऊट गाईडचे राष्ट्रीय संचालक डॉ. राकेशकुमार मिश्रा, उत्तरप्रदेशचे सांस्कृतिक मंत्री यशवंत निकोसे, डॉ. प्रदीप टंडन, राजाभाऊ उंबरकर, दयाराम रॉय, साहित्यकार टी. बी. चंद्रसुब्बा (सिक्कीम), पंजाबी कलाकार युधिष्ठिर राणा, शिवयोगी स्वामी कृष्णकांत महाराज यांच्यासह देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारताना प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांनी आपल्या ३२ वर्षांच्या शैक्षणिक सेवेचे व सामाजिक कार्याचे हे फळ असल्याची भावना व्यक्त करत, वर्ल्ड सेवन वंडर्स रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमुख तथा संमेलनाचे आयोजक ॲड. डॉ. क्रांती महाजन व संपूर्ण आयोजक समितीचे भावपूर्ण आभार मानले.
हा पुरस्कार नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.