पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत महिलांवर अन्याय होत असल्याचा आरोप – योजना सुधारण्याची ज्येष्ठ शिक्षक नेते प्र. ह. दलाल यांची मागणी

भुसावळ |(प्रतिनिधी ) – राज्यात सध्या अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. शिक्षक नियुक्तीत होणारा भ्रष्टाचार टाळावा, तसेच गुणवत्ता असलेल्या पात्र उमेदवारांना जात, पैसा आदी कारणांमुळे डावलले जाऊ नये, या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. मात्र हीच योजना महिलांसाठी अन्यायकारक ठरत असल्याचा आरोप ज्येष्ठ शिक्षक नेते प्रा. ह. दलाल यांनी केला आहे.

या योजनेनुसार शिक्षकांची नियुक्ती राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात केली जाते. पुरुष शिक्षकांसाठी ही अट तुलनेने सोयीची असली, तरी महिलांच्या बाबतीत ती अत्यंत कठीण असल्याचे दलाल यांनी स्पष्ट केले. अविवाहित महिलांना स्वतःचे गाव किंवा जिल्हा सोडून ३०० ते ४०० किलोमीटर अंतरावर नोकरीसाठी जाणे अनेक कारणांमुळे अशक्य ठरते. घरात भाऊ नसणे, आई-वडील वृद्ध किंवा आजारी असणे अशा परिस्थितीत त्यांना एकट्याने दूर राहणे अवघड होते.

तसेच विवाहित महिलांच्या बाबतीत लहान मूल असणे, पतीची नोकरी बदली न होणाऱ्या खात्यात असणे, अशा कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे दूरवर नोकरी करणे शक्य होत नाही. परिणामी पात्रता, इच्छा आणि गरज असूनही अनेक महिला उमेदवार शिक्षक पदापासून वंचित राहत असल्याचे त्यांनी नमूद केले.

महिलांसाठी प्रथम त्यांच्या गावात, ते शक्य नसेल तर तालुक्यात आणि किमान जिल्ह्यातच नियुक्तीची संधी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी ठाम मागणी दलाल यांनी केली. विशेष म्हणजे स्व जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असताना, तेथे इतर दूरच्या जिल्ह्यातील उमेदवारांची नियुक्ती करणे आणि स्थानिक उमेदवारांना दूर पाठवणे हे न्यायसंगत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

शासन एकीकडे महिलांना ‘लाडकी बहीण’ म्हणून संबोधते, तर दुसरीकडे त्यांच्या स्वावलंबनाच्या मार्गात अडथळे निर्माण करते, ही मोठी विसंगती असल्याचे दलाल यांनी अधोरेखित केले. त्यामुळे पवित्र पोर्टल शिक्षक भरती योजनेत तातडीने सुधारणा करून महिलांवरील हा अन्याय दूर करावा, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.