नाहाटा महाविद्यालयात पारंपरिक वेशभूषा व भारतीय नृत्यांनी वेधले विद्यार्थ्यांचे लक्ष

भुसावळ ( प्रतिनिधी )

भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान व पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कलागुण सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत फूड स्टॉल व पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

फूड स्टॉलमध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे रुचकर खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून विक्री केली. पारंपरिक वेशभूषा स्पर्धेमध्ये गुजराती नृत्य, महाराष्ट्रीयन लावणी, राजस्थानी, कोळी, तामिळ, बंगाली, आदिवासी, पंजुली अवतार व तळीम नृत्य अशा विविध भारतीय नृत्यप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीचे समृद्ध दर्शन घडले.

विद्यार्थ्यांनी आसाम, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान आदी प्रांतांतील पारंपरिक वेशभूषा परिधान करून नृत्य सादर केले. छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज यांच्या वेशभूषांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. काही विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेतून शेतकऱ्यांच्या व्यथा, भारतीय संस्कृतीचे महत्त्व व महाविद्यालयीन जीवनावर आधारित कविता सादर केल्या.

या कार्यक्रमास प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. डी. एन. पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. आर. वाणी, कला मंडळ प्रमुख प्रा. स्मिता बेंडाळे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग उपस्थित होता. परीक्षक म्हणून डॉ. विद्या पाटील, डॉ. रश्मी शर्मा, डॉ. राजेंद्र नाडेकर व डॉ. चंद्रकांत सरोदे यांनी काम पाहिले.

पारंपरिक वेशभूषा विभाग प्रमुख म्हणून प्रा. डॉ. ममताबेन पाटील यांनी तर फूड स्टॉल प्रमुख म्हणून प्रा. प्रणिता राणे यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दिनानाथ पाठक व प्रा. सतीश अहिरे यांनी केले. या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.