भुसावळ तालुक्यात दुष्काळी अनुदान वाटपात कथित गैरव्यवहार; चौकशीचे आदेश


भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यात सन 2022-23 मध्ये झालेल्या दुष्काळासाठी सन 2024-25 मध्ये वितरित करण्यात आलेल्या अनुदानाच्या वाटपात कथित गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे 4 नोव्हेंबर 2025 रोजी तक्रार अर्ज सादर केला होता. या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

तक्रार अर्जानुसार, भुसावळ येथील तहसीलदार निता लबडे व संबंधित कर्मचाऱ्यांनी अनुदान वाटप करताना शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आधारकार्ड, सातबारा उतारे व पंचनामे यांच्या आधारे ज्यांची शेती नाही अशा व्यक्तींनाही त्यांच्या बँक खात्यांवर दुष्काळी अनुदान वितरित करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.

या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने हालचाल करत निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी 5 जानेवारी 2026 रोजी भुसावळ विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीत संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास त्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे सविस्तर अहवाल सादर करावा, तसेच कारवाईच्या अनुषंगाने तक्रारदार केदारनाथ सानप यांना समर्पक उत्तर देण्याचे निर्देशही आदेशात देण्यात आले आहेत.

या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीकडे भुसावळ तालुक्यातील शेतकरी तसेच संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, चौकशीअंती नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.