भुसावळ, (प्रतिनिधी)-— भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक व कवयित्री सावित्रीबाई फुले यांची जयंती ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या नीना कटलर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कार्यक्रमादरम्यान प्राचार्या नीना कटलर यांनी विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्या विषयी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. समाजसुधारक व कवयित्री म्हणूनही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांनी पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या की सोबत मुलींच्या शिक्षणासाठी व महिलांच्या हक्कांसाठी मोलाचे कार्य केले. १८४८ साली पुणे येथे त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. समाजातील अनिष्ट रूढींविरुद्ध आवाज उठवत स्त्री-शिक्षणाचा भक्कम पाया त्यांनी रचला. आधुनिक भारतातील स्त्रीवादी चळवळीच्या त्या अग्रणी मानल्या जातात.
या प्रसंगी शाळेच्या उपप्राचार्या श्रद्धाली घुले, मनप्रीत कौर, प्रतिभा काकडे, हर्षला चौधरी, वर्षा काळे तसेच इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थिनी, शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संगीत बऱ्हाटे व रोहिणी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.


