क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य अखंड ऊर्जा स्त्रोत – प्रा. दिनेश पाटील

भालोद (प्रतिनिधी )- सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथे कला मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. किशोर कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमप्रसंगी कला मंडळाचे प्रमुख प्रा. दिनेश पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा सविस्तर परिचय करून दिला. ते म्हणाले की, ज्या काळात समाजात अंधश्रद्धा, अनावश्यक कर्मकांड व अज्ञान मोठ्या प्रमाणावर होते, त्या प्रतिकूल परिस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी समाजप्रबोधनाचे कार्य हाती घेतले. समाजात आमूलाग्र बदल घडवायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, ही जाणीव ठेवून सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची जबाबदारी स्वतः स्वीकारली व एक नवा आदर्श निर्माण केला. त्यांचे कार्य आजही पुढील पिढ्यांसाठी ऊर्जा देणारे व प्रेरणादायी आहे, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा. किशोर कोल्हे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला मंडळाच्या सदस्या प्रा. डॉ. मीनाक्षी वाघुळदे यांनी केले.

यावेळी उपप्राचार्य प्रा. मुकेश चौधरी, कला मंडळाचे सदस्य डॉ. सुनील नेवे, डॉ. आशुतोष वर्डीकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.