भुसावळ उपनगराध्यक्षपदावरून राजकीय हालचाली वाढल्या : भाजपातील पाच नगरसेवकांना एक-एक वर्षाची संधी मिळण्याची शक्यता

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर २५ दिवसांच्या आत उपनगराध्यक्षपदासाठी विशेष सभा घेणे बंधनकारक आहे. या नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर लवकरच विशेष सभेचे आयोजन करून उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे शहरातील राजकारणात पुन्हा एकदा चैतन्य आले असून उपनगराध्यक्ष, विषय समिती सभापती तसेच स्वीकृत नगरसेवक पदांवर कोणाची निवड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी अद्याप संधी न मिळालेल्या नगरसेवकांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२७ जागांवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व

नगरपालिकेत भाजपकडे २७ जागांचे स्पष्ट बहुमत असल्याने उपनगराध्यक्षपद भाजपाच्याच नगरसेवकाला मिळणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. भाजपने उपनगराध्यक्षपदासाठी प्रत्येकी एक वर्ष अशा कालावधीत पाच नगरसेवकांना संधी देण्याचे नियोजन केल्याची चर्चा आहे. या निवडीत जातीय समतोल, पक्षनिष्ठा, मागील टर्ममध्ये संधी न मिळालेले तसेच अल्पसंख्याक समाजातील नगरसेवकांचा विचार केला जाणार आहे. पहिली संधी कोणाला मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.

या नगरसेवकांची नावे चर्चेत

भाजपकडून उपनगराध्यक्षपदासाठी अद्याप अधिकृत नाव जाहीर झाले नसले, तरी नगरसेवकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. सामाजिक कार्यात सक्रिय असलेले आणि मागील पंचवार्षिक काळात प्रबळ दावेदार असूनही संधी न मिळालेले निर्मल कोठारी, लेवा पाटीदार समाजातील सोनल महाजन, परीक्षित बर्हाटे, गिरीष महाजन तसेच मराठा समाजाचे नगरसेवक राजेंद्र आवटे यांची नावे सध्या चर्चेत आहेत. यापैकी पहिल्यांदा कोणाला संधी मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

लवकरच निवड प्रक्रिया पूर्ण होणार

उपनगराध्यक्षपदाची निवड नगरपालिकेच्या विशेष सभेत केली जाणार असून ही सभा लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. अद्याप पालिका प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत सूचना प्राप्त झालेल्या नसल्या तरी सर्वसाधारण निवडणुकीनंतर २५ दिवसांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याने १५ जानेवारीपर्यंत उपनगराध्यक्ष निवड होण्याची शक्यता आहे.

सर्वानुमते निर्णय होईल : युवराज लोणारी

उपनगराध्यक्षपद देताना जातीय समतोलासोबतच कार्यक्षमतेला महत्त्व दिले जाणार असल्याचे भाजप गटनेते युवराज लोणारी यांनी सांगितले. तसेच पालिकेच्या कामकाजात पक्षाला बळकटी मिळावी, या उद्देशाने स्वीकृत नगरसेवक पदांवर अभ्यासू आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. यासंदर्भात मंत्री संजय सावकारे यांच्यासोबत चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.