भुसावळ(प्रतिनिधी ) – येथील कला, विज्ञान आणि पू. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन विभाग व माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वाणिज्य शाखेतील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी “व्यावसायिक अभ्यासक्रमातील संधी (CA, CS, CMA)” या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी भुसावळ शहरातील नामांकित चार्टर्ड अकाउंटंट श्री. मुकेश अग्रवाल हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. ब-हाटे होते. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. डी. एन. पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. आर. वाणी, उपप्राचार्य प्रा. वाय. एम. पाटील, पर्यवेक्षिका प्रा. स्वाती पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. प्रशांत पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विभागप्रमुख प्रा. डॉ. ममताबेन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना चार्टर्ड अकाउंटंट श्री. मुकेश अग्रवाल यांनी CA या व्यावसायिक अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती दिली. आजच्या स्पर्धात्मक युगात या अभ्यासक्रमाचे महत्त्व, त्यासाठी आवश्यक असलेले परिश्रम, अभ्यासपद्धती, तसेच या क्षेत्रातून उपलब्ध होणाऱ्या विविध रोजगार संधी याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चार्टर्ड अकाउंटंटचे समाजातील महत्त्व व व्यावसायिक जबाबदाऱ्या यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. ब-हाटे यांनी विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेतील व्यावसायिक अभ्यासक्रमांचे महत्त्व ओळखून उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करावा, आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत व सातत्यपूर्ण परिश्रम केल्यास यश निश्चित मिळते, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. चंद्रकांत सरोदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. स्मिता बेंडाळे यांनी केले. या कार्यक्रमास ICAI जळगाव शाखेचे श्री. सचिन शिंदे व श्री. विनोद जाधव, वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील सर्व प्राध्यापकवृंद तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील सर्व प्राध्यापक तसेच माजी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
फोटो कॅप्शन-सीए मुकेश अग्रवाल हे प्राचार्य डॉ.बी एच बऱ्हाटे यांना करियर कौन्सिलिंग सेंटर चे प्रमाणपत्र देताना


