भुसावळ( प्रतिनिधी ) –
भुसावळ शहरातील अमृत टप्पा २ अंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईन टाकण्याच्या कामात गंभीर अनियमितता आढळून आल्याने नगरपालिकेने संबंधित ठेकेदाराला २४ तासांच्या आत आवश्यक सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी या कामाबाबत दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी मुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रारीत पाईपलाईन टाकताना खोदकामाची संपूर्ण माती रस्त्यावर टाकली जात असल्याने वाहतूक व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून अनेक ठिकाणी पाईपलाईन गळती होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच ठेकेदाराकडून निविदेतील अटी व शर्तींचा भंग होत असल्याचेही नमूद करण्यात आले होते. या तक्रारीची दखल घेत भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी जा.क्र. भुनपा/अमृत/64/2025-26, दि. १/१/२०२६ रोजी संबंधित ठेकेदारास नोटीस बजावली आहे. यांत्रिकी पर्यावरण अमृत विभागाचे नगर अभियंता दिपक चौधरी यांच्या सहीचे व मुख्याधिकारी यांच्या मान्यतेचे हे पत्र देण्यात आले आहे.
पत्रकात काम निविदेप्रमाणे होत नसल्याचे नमूद करत सुरक्षिततेसाठी बॅरिकेटींग करणे, खोदकाम व मातीचे योग्य व्यवस्थापन, पाईपलाईन टाकल्यानंतर गळती तपासणी करणे, रस्ते पूर्ववत करणे तसेच पाणीपुरवठा व स्वच्छतेची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सर्व बाबींवर ठेकेदाराने २४ तासांच्या आत कार्यवाही करावी व भविष्यातही याची दक्षता घ्यावी, अन्यथा निविदेतील क्लॉज क्रमांक ३ व ४ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे शहरातील अमृत योजनेच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांकडूनही योग्य देखरेखीची मागणी होत आहे.


