भुसावळात तालुका विधी सेवा समितीच्यावतीने मार्गदर्शन शिबिर:

भुसावळ प्रतिनिधी –
भुसावळ येथील श्री गाडगेबाबा प्राथमिक विद्यालयात तालुका विधी सेवा समिती, भुसावळ यांच्या वतीने दिनांक २९ डिसेंबर रोजी विधी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना केंद्रीय विधी सेवा समितीची ‘बाळ योजना २०२४’, पोस्को कायदा तसेच पर्यावरण संवर्धनासंबंधी कायदे व त्यांची आवश्यकता याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

या शिबिराचे प्रमुख वक्ते म्हणून तालुका विधी सेवा समिती, भुसावळचे रिटेनर वकील ॲड. अभिजीत मेने उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना बाळ योजना २०२४, पोस्को कायद्याच्या तरतुदी तसेच पर्यावरण संरक्षणासंबंधी कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. यावेळी त्यांनी “झाडे लावा व झाडे जगवा” असा संदेश देत पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विधी सेवा समितीच्या पी.एल.व्ही. रूपाली नेवे यांनी विशेष परिश्रम घेतले असून त्यांना पी.एल.व्ही. स्वाती भोळे यांनी सहकार्य केले. यावेळी पी.एल.व्ही. रूपाली नेवे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भुसावळ यांची माहितीपत्रके विद्यार्थ्यांना वितरित केली. कार्यक्रमाच्या शेवटी ॲड. अभिजीत मेने यांनी विद्यालय प्रशासनाचे आभार मानले.

या कार्यक्रमास श्री गाडगेबाबा प्राथमिक विद्यालय, भुसावळ येथील शिक्षक प्रेरणा लुंजकर, नितीन ओव्हाळ, रंजना पाटील, अमोल पाटील, आर. आर. तपकीरे तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.