भुसावळ (प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील अंधारमळी परिसर महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे. येथे राज्यातील पहिले ‘डार्क स्काय पार्क’ उभारले जात असून, नुकत्याच झालेल्या चंद्रग्रहणाच्या साक्षीने या ऐतिहासिक प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम खगोलप्रेमींसाठी पर्वणी ठरणार असून, विज्ञान, पर्यटन, रोजगार आणि ग्रामीण विकासाचा संगम साधणारा आहे.
नॅशनल स्पेस डे 2025 निमित्ताने मुख्यमंत्री यांनी घोषणा केली की, महाराष्ट्र लवकरच देशातील पहिले ‘डार्क स्काय पॉलिसी’ राबवणारे राज्य म्हणून ओळखले जाईल. त्यांनी प्रकाशप्रदूषण कमी करून आकाशाचे नैसर्गिक सौंदर्य जपणे आणि तरुण पिढीला विज्ञानाशी जोडणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले.
तर आमदार अमोल जावळे : “या प्रकल्पामुळे युवकांना रोजगार, विद्यार्थ्यांना विज्ञानाचे ज्ञान, तर जिल्ह्याला जागतिक ओळख मिळेल.”

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद : “हे पार्क केवळ पर्यटन नसून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एक जिवंत विज्ञान प्रयोगशाळा ठरेल.”
उपवनसंरक्षक शेख : “स्थानिक तरुणांना ॲस्ट्रोगाईड प्रशिक्षण, तर महिला बचतगटांना होमस्टे व हस्तकलेतून रोजगार उपलब्ध होईल.”
आशियातील डार्क स्काय डिफेंडर पुरस्कार विजेत्या तज्ज्ञ श्वेता कुलकर्णी यांनी भेट दिल्यानंतर मत व्यक्त केले की – “अंधारमळी भारताच्या पहिल्या प्रमाणित डार्क स्काय पार्कसाठी आदर्श ठिकाण आहे. भविष्यात संपूर्ण यावल वन विभाग ‘डार्क स्काय संरक्षित क्षेत्र’ होऊ शकतो.”
या प्रकल्पामुळे होणारे फायदे
जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा विकास
अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती खगोल पर्यटन, इको-टूरिझम, शैक्षणिक व साहसी पर्यटनाला चालना
ग्रामीण विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचे प्रत्यक्ष शिक्षण प्रकाशप्रदूषण नियंत्रण व जैवविविधतेचे संरक्षण
महाराष्ट्र ‘डार्क स्काय पॉलिसी’चे नेतृत्व करणारे पहिले राज्य
विज्ञान-पर्यटनाच्या नव्या अध्यायाची सुरुवात . चंद्रग्रहणाच्या साक्षीने सुरू झालेला हा उपक्रम महाराष्ट्राच्या गौरवशाली वाटचालीतील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे.


