भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील भिरूड कॉलनीतील दत्त मंदिर येथे अखिल भारतीय त्रिपदी परिवारातर्फे प.पू.श्री.बाबा महाराज तराणेकर यांच्या 75व्या वाढदिवस सोहळ्यानिमित्त शाखा भुसावळ 106 कुंडी दत्तयाग संपन्न झाला.
अखिल भारतीय त्रिपदी परिवारातर्फे प.पू.श्री.बाबा महाराज तराणेकर यांच्या 75व्या वाढदिवसनिमित्त 75 दत्तयाग व सत्यदत्त पूजेचा संकल्प प.पू.श्री.नाना महाराज तराणेकर संस्थान इंदौर येथे करण्यात आला होता. अखिल भारतीय त्रिपदी परिवाराने घरोघरी केलेल्या 59 दत्तयाग सांगता समारोह प.पू. श्री.बाबा महाराज तराणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील भिरूड कॉलनीतील दत्त मंदिर येथे दि.21 ऑगस्ट रोजी सुमारे 106 दत्त भक्तांनी एकाचवेळी दत्तयाग व सत्यदत्त पूजन केले. दरम्यान सकाळी आठ वाजता धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होऊन, 12 वाजता प.पु.बाबा महाराज तराणेकर यांच्या हस्ते पूर्णाहुती संपन्न झाली. यानंतर मोठ्या उत्साहात महाआरती करण्यात आली. प.पू.बाबा महाराज यांचे प्रबोधन दत्तभक्तांना भावले. सत्यदत्त पूजा व दत्त यागाचे महत्त्व विषद करून, वास्तुशुद्धी व निरोगी आयुष्य लाभासाठी प्रत्येकाने, आपल्या घरी दत्त याग करावा, असे आवाहन केले. यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. संध्याकाळी करुणा त्रिपदी व भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी भिरूड कॉलनीती दत्त भक्त नितीन चव्हाण यांचे विशेष योगदान लाभले. यशस्वितेसाठी परिभ्रमण त्रिपदी परिवाराच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.




