महाराष्ट्रात पावसाचा तडाखा! ८ जिल्ह्यांना रेड अलर्ट ; जळगावमध्येही पावसाचे पुनरागमन ;

जळगाव / मुंबई – अरबी समुद्रापासून ते पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून, अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. परिणामी, काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने आज राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, काही काळासाठी ओसरलेला जळगावातील पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे, ज्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

या जिल्ह्यांना रेड अलर्ट
रायगड

रत्नागिरी

सातारा

पुण्याचा घाटमाथा

चंद्रपूर

गडचिरोली

गोंदिया

भंडारा

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
वर्धा

नागपूर

कोल्हापूर

सिंधुदुर्ग

ठाणे

मुंबई आणि उपनगर

मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

जळगावमध्ये पावसाचे पुनरागमन
जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती, मात्र आता पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असून, हवामान विभागाने २६ जुलैसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. सलग दुसऱ्या दिवशी जळगाव शहरासह इतर भागांत पावसाची नोंद झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून, तापमानही ३० अंश सेल्सियसच्या खाली जाणार आहे.