भुसावळ (प्रतिनिधी ) – सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी गणित व विज्ञानाच्या मुलभूत संकल्पना प्राथमिक टप्प्यावरच समजून घेतल्या, तर उच्च शिक्षणासाठीची पायाभरणी अधिक भक्कम होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुस्तकांपुरते न राहता प्रयोगशील शिक्षणाकडे वळावे, असे प्रतिपादन देवगिरी इन्स्टिट्यूटचे संचालक शशी राय यांनी रविवारी केले.

शहरातील देवगिरी इन्स्टिट्यूटमध्ये इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात कलाम सायंटिस्ट सेंटरच्या माध्यमातून गणित व विज्ञान विषयक संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगातून समजावून सांगण्यात आल्या.
कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर अवकाश, विज्ञान आणि गणितविषयक विविध अॅक्टिव्हिटी किट्सचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या किट्सच्या सहाय्याने विद्यार्थी स्व-अभ्यास करू शकतील, तसेच त्यांना प्रसिद्ध वैज्ञानिकांशी थेट संवाद साधण्याची संधी देखील मिळणार आहे.
या कार्यक्रमात जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष संदीप पाटील, ऍड. जयश्री राय, वनिता अग्रवाल, योगिता झांबरे, नीलिमा पाटील, कविता अग्रवाल, सचिन नागपुरे आणि नदीम शेख यांची उपस्थिती होती.
संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी विज्ञान मंथन (VVM) परीक्षेविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना भारतीय वैज्ञानिक, संशोधक आणि ज्ञान परंपरा याविषयी सखोल माहिती मिळते. यासोबतच आयआयटी आणि अन्य प्रतिष्ठित संस्थांमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येते.
नदीम शेख यांनी मॉडर्न पिरिऑडिक टेबल व त्यातील मूलद्रव्ये सुलभपणे कशी शिकवता येतात, याचे प्रभावी प्रात्यक्षिक दाखवले. अणूंची रचना, मुलद्रव्यांची संज्ञा आणि स्मरणशक्ती वाढवणाऱ्या ट्रिक्स त्यांनी विद्यार्थ्यांना शिकविल्या.
वनिता अग्रवाल यांनी गणितातील अवघड क्रिया सुलभ करण्यासाठी विशेष तंत्रे समजावून सांगितली. मोठ्या संख्यांचे सहज पाढे तयार करण्यासाठी सरावही विद्यार्थ्यांना करवण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन नागपुरे यांनी केले.


