वाल्मीक समाजाने प्रगतिशील व्हावे; सफाई कामगारांच्या समस्यांवर सारवान यांचा भर –


भुसावळ (प्रतिनिधी ) “ वाल्मीक समाजाने उच्च शिक्षण घेऊन प्रगतिशील होण्याचा मार्ग स्वीकारावा आणि समाजात नवा आयाम निर्माण करावा,” असा आशावाद महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी व्यक्त केला. बुधवार रोजी त्यांनी भुसावळ नगरपालिकेला भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला.

सारवान हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून, सफाई कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता.त्यांनी भुसावळ भेटी दरम्यान सफाई कामगारांच्या अडचणी, तक्रारी यांचा आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निराकरणाचे निर्देश दिले.

सारवान यांनी स्पष्टपणे सांगितले की, सफाई कामगारांच्या कामाशी संबंधित दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे न केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.भुसावळ शहरातील सफाई कामगारांची अपुरी संख्या लक्षात घेता, राज्य शासनाकडे कामगार संख्यावाढीसाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

धुळे महापालिकेत लाड समितीच्या शिफारशींच्या अधीन राहून ३० जागांची भरती करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय,रावेर नगरपालिकेतही सफाई कामांशी संबंधित कंत्राटे वाल्मीक समाजाच्या सामाजिक संस्थांना देण्यात आली आहेत.सफाई कामांमध्ये या समाजाच्या संघटनांनी सक्रिय सहभाग घ्यावा, यावर त्यांनी भर दिला.

या बैठकीस मुख्याधिकारी राजेंद्र फातले, उपमुख्याधिकारी परवेज शेख, आस्थापना प्रमुख वैभव पवार, नगर अभियंता पंकज मदगे, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता नितीन चौधरी,आरेखक महेश चौधरी तसेच वाल्मीक समाजाचे अध्यक्ष मिथुन बारसे यांची उपस्थिती होती.

या बैठकी दरम्यान सफाई कामगारांच्या संघटनांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न आणि समस्यांवर सखोल संवाद साधण्यात आला.सफाई कामगारांना न्याय मिळावा आणि त्यांचे जीवनमान उंचावावे, हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश असल्याचे सारवान यांनी स्पष्ट केले.