रिसॉर्टसाठी चांगली जागा दाखवण्याच्या बहाण्याने मुक्ताईनगर तालुक्यात बंगळूरूच्या पर्यटकांना मारहाण करीत लूटले -टोळी पुन्हा सक्रिय साडेआठ लाखांचा ऐवज लंपास : दहा संशयीतांविरोधात दरोड्याचा गुन्हा

भुसावळ (प्रतिनिधी ) – धुपेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या कर्नाटक राज्यातील बंगळूरूच्या पर्यटकांना महिलेच्या माध्यमातून रिसॉर्टसाठी चांगली जागा असल्याचे भासवून भामट्यांनी बोलावत मारहाण करीत तब्बल साडेआठ लाखांचा ऐवज लुटला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात दहा संशयीतांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला

असे आहे प्रकरण
कर्नाटक राज्यतील बंगळुरू येथील अभिषेक एस.सी. आणि त्यांचा मित्र सतीश हे मलकापूर तालुक्यातील धुपेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन ते शनिवार, 22 मार्च रोजी अजिंठा येथे जाण्यासाठी निघाल्यानंतर पुलावरील ब्रिजवर त्यांना एक महिला भेटली. तिने मधापुरी धरणाजवळ रिसॉर्ट बांधण्यासाठी खूप चांगली जमीन विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. अभिषेक हे व्यावसायीक असल्याने त्यांनी यासाठी होकार दिला. यानंतर ते मधापुरी गावात गेले. मधापुरीत पोहोचताच अचानक दहा जणांनी त्यांना घेरले. यानंतर दोघांना लाथा-बुक्यांनी मारहाण करण्यास सुरूवात करीत तब्बल साडेआठ लाखांचा ऐवज लुटला. आरोपींनी दोन लाखांची रोकड, 75 हजार रुपये किंमतीची गोल्ड रिंग, दिड लाख रुपये किंमतीचे ब्रासलेट, 25 हजार रुपये किंमतीचा मोबाईल तसेच डेबीट व क्रेडीट कार्डच्या आधारे चार लाख रुपये ट्रान्सपर करीत साडेआठ लाखांचा ऐवज लुटण्यात आला. आरोपींनी यानंतर दोघांचे हरीणाच्या कातड्यासोबत फोटो काढले व पोलिसात तक्रार दिल्यास हे फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत पळ काढला.

दहा जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा
अभिषेक आणि सतीश यांनी तातडीनं मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यावरून दहा अज्ञात आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहेत.