भुसावळ (प्रतिनिधी ) – मानापुरी या.यावल येथिल होळी उत्सवात देवगिरी कल्याण आश्रम भुसावळ विभागातील कार्यकर्त्यांनी जनजाती बांधवासोबत सहभागी होऊन होळीचा आनंद लुटला . अतिशय उत्साहाने व रूढी व संस्कृती टिकवून पारंपारीक पद्धतीने होलिका दहन करण्यात आले .

अशी साजरी होते होळी ….
होळी सणाला संपूर्ण दिवसभर आदिवासी बांधव उपवास करतात रात्री होळी पूजन करून होळी दहन करतात . होळी पूजनासाठी पळसाच्या फुलांचे तोरण बांधून , साखरेचा हार , यासह पूजा सामग्री वापरले जाते व पूजन केले जाते . त्यानंतर घराघरातून होळीला नैवद्य अर्पण केला जातो व हे बांधव उपवास सोडतात .
होळी च्या आधी महिनाभर किंवा 15 दिवस आधी पासून तयारीला सुरवात केली जाते अर्थात होळीचा दांडा गाडला जातो व परंपरेनुसार दरवर्षी एकाच ठिकाणी होळी करण्यात येते. होळी पेटवल्या नंतर एक युवक लांब बांबू हातात घेऊन होळीला पाच प्रदक्षिणा घालतो .या उत्सवासाठी सासुरवाशीण मुली माहेरी येतात तर नातेवाईक आप्तइष्टही येतात . या आदिवासी पाड्यावर विविध भागातील आदिवासी बांधव पारंपारिक ढोल घेऊन समूहाने एकत्र येतात यात जिल्ह्यासह मध्यप्रदेश , खरगोन आदी भागातील बांधव सहभागी होतात . सुमारे 40 वर्षांपासून मानापुरी येथे हे बांधव वास्तवास असून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होळी उत्सव साजरा करतात . विविध भागातून आलेले हे ढोल पथक रात्रभर ढोल वाजवून नृत्य करीत आपली कला सादर करतात हा उत्सव होळी नंतर पाच दिवस साजरा करतात पाच दिवसानंतर रंगपंचमी साजरी करतात
आपली संस्कृती व परंपरा भावी पिढीने सुद्धा जतन करून जोपासावी हा मुख्य उद्देश आम्हां आदिवासी बांधवांचा आहे यासाठी विविध भागातून आलेले ढोल पथक यांच्या स्पर्धा घेण्यात येतात त्यांना बक्षिसे जाहीर करण्यात येतात तसेच सहभागी पथकाला उत्स्फूर्त पणे सहभागी बक्षीस दिले जाते . बाहेरगावहून आलेले बांधव व शहराती विविध भागातून आलेले भगिनी व बांधव यांचे पाड्यावरील या जनजाती बांधवांनी अतिशय उत्तम असे स्वागत व आदरतिथ्य केले . सर्वानी वस्तीवरील भोजनाचा आस्वाद घेत ढोल नृत्याचा आनंद घेतला .
यावेळी देवगिरी कल्याण आश्रमचे कांशीराम बारेला सर , विरसिंग वसावे यांचेसह सहकारी यांचे विशेष सहकार्य लाभले .-


