नाशिक हादरले : दोन सख्ख्या भावांची धारदार शस्त्राने हत्या !

नाशिक – दोन सख्ख्या भावांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. उपनगर परिसरातील आंबेडकर वाडी येथे बुधवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. उमेश उर्फ मुन्ना जाधव आणि त्यांचे बंधू प्रशांत जाधव अशी हत्या झालेल्या भावांची नावे आहेत .

उमेश उर्फ मुन्ना जाधव हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने नाशिक शहरात एकच खळबळ माजली आहे.दोघांची हत्या करून अज्ञात हल्लेखोर फरार झाले आहेत. हत्येचे कारण सध्या स्पष्ट झालेले नाही. मात्र, या दुहेरी हत्येने परिसरात घबराट पसरली आहे.

घटनेची माहिती समजतात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्या ठिकाणी आंबेडकर वाडीतील व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या घटनेमुळे रंगपंचमीला नाशिक शहरात गालबोट लागले असून रंगाचा भंग झाला अशी चर्चा सुरू झाली आहे.