कुऱ्हा काकोडा महाविद्यालयात व्यसनमुक्ती जाणीव जागृती कार्यशाळा संपन्न ;


मुक्ताईनगर – तालुक्यातील कला वाणिज्य आणि विज्ञान (वरिष्ठ) महाविद्यालय, कुऱ्हा काकोडा येथे नुकतीच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून एक दिवसीय व्यसनमुक्ती जाणीव जागृती कार्यशाळा संपन्न झाली. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील भौतिक शास्त्र विभाग प्रमुख आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे जळगाव जिल्हा संघटक प्रा डॉ दयाघन एस राणे प्रमुख वक्ते म्हणून तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी व्ही पिंगळे उपस्थित होते.


कार्यक्रम प्रसंगी व्याख्यान देत असताना प्रा डॉ दयाघन राणे यांनी अमली पदार्थांचे विविध प्रकार आणि त्यांचे शरीरावर होणारे परिणाम स्पष्ट केले. तसेच मोबाईल फोन चा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला असून अनेक लोकांना त्याचे व्यसन लागल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मोबाईल फोन चे व्यसन लागले असल्याचे कसे ओळखावे व आपण त्या संदर्भात आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी कशा उपाय योजना करता येतील या बद्दल माहिती स्पष्ट केली. तसेच वैज्ञानिक प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करीत असताना कोणत्याही तंत्रज्ञानाच्या विकासासह मोबाईल फोन आणि त्याचे विकसित होत जाणारे तंत्रज्ञान या गोष्टीना आपण नाकारू शकणार नाही. परंतु आपल्याला सुरक्षित राहण्यासाठीच्या उपाय योजना आपल्याला विज्ञानाच्या मदतीनेच स्वीकाराव्या लागतील असे मत स्पष्ट केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ पी व्ही पिंगळे यांनी अमली पदार्थ असो की विकसित तंत्रज्ञान कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो हे सांगून आपला स्क्रीन टाइम खूपच वाढलेला असून त्याच्यावर नियंत्रण आणणे अत्यंत गरजेचे आहे. मोबाईल फोन च्या लहरींचा शरीरावर परिणाम होत असून त्याचे दुष्परिणाम समाजात दिसायला लागलेले आहेत. म्हणून आपल्या मागच्या पिढ्या ज्याप्रमाणे राहत होत्या तश्या पद्धतीची जीवनसरणी स्वीकारली पाहिजे असे आवाहन केले.
कार्यशाळेचे व्याख्यान सत्र संपल्यावर विद्यार्थ्यांसाठी विविध अमली पदार्थ आणि त्यांचे शरीरावर होणारे परिणाम दर्शविणाऱ्या पोस्टर्स चे प्रदर्शन लावण्यात आले होते. ही प्रदर्शन पहिल्या नंतर विद्यार्थ्यांनी गटचर्चे मध्ये सहभाग घेत मिळालेल्या माहितीचे चिंतन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालया च्या प्रा. जितेश कुलकर्णी यांनी केले. तर आभार प्रदर्शन भौतिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा सौ भाग्यश्री ढगे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी, तसेच महाविद्यालयाच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.