भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ रेल्वे विभागीय कार्यालयात दिनांक 17 मार्च 2025 रोजी राजभाषा कार्यान्वयन समितीची तिमाही बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय होत्या.

बैठकीचे संचालन राजभाषा अधिकारी डॉ. शंकरसिंह परिहार यांनी केले. या बैठकीत मंडळाच्या सर्व विभागांचे वरिष्ठ शाखा अधिकारी उपस्थित होते आणि त्यांनी हिंदी भाषेच्या उपयोगासंदर्भात आपले विचार मांडले. हिंदीच्या अधिकाधिक वापरास चालना देणे, कार्यालयीन कामकाजात हिंदीचा प्रभावी वापर, राजभाषा अधिनियमाच्या अंमलबजावणीचे पालन तसेच संबंधित उपक्रमांची समीक्षा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कार्यालयीन पत्रव्यवहार, प्रशासकीय कार्य मध्ये हिंदीला प्राधान्य देण्यात यावे. हिंदीचा अधिकाधिक वापर सुनिश्चित करून राजभाषेच्या प्रचारासाठी सर्वांनी योगदान द्यावे.
या बैठकीस अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) श्री सुनील कुमार सुमन, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) श्री एम. के. मीणा यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



