नाशिक – नाशिकमधील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यातच युवकाचा टोळक्याने खून केल्याचा प्रकार शनिवारी रात्री उशिरा समोर आला. अरुण राम बंडी (29, रा.कामगार नगर, सातपूर ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

जुन्या वादातून खून
सातपूर परिसरातील कामगार नगर भागातील अरुण हा संत कबीर नगर परिसरात रात्री आला असता त्याचे जुने वाद असलेल्या सातपुरच्या एका टोळक्याने त्याला या ठिकाणी घेरले. धारदार शस्राने त्याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अरुण हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळाहून पसार झाले.
गंगापूर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत परिसरात शोध घेत तिघा हल्लेखोर संशयिताना ताब्यात घेतले. यामधील दोघे जण पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव, गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर या अधिकार्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
दरम्यान मृतदेह घटनास्थळावरून शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर परिसरात गर्दी जमली होती यामुळे सरकारवाडा पोलीस ठाण्याचा बंदोबस्त शासकीय रुग्णालयात तैनात करण्यात आला होता.


