भावासह प्रियकराच्या मदतीने पतीचा खून ; गुन्हे शाखेने गुन्हा आणला उघडकीस ; तिघांना बेड्या ;

कर्जत : अनैतिक संबंधात पतीच अडसर ठरू पाहत असल्याने पत्नीने भावासह प्रियकराची मदत घेत पतीचा खून करीत मृतदेह पुरला मात्र गुन्हे शाखेने हा खून उघडकीस आणत तिघांना बेड्या ठोकल्या. दत्तात्रय वामन राठोड (रा.जमशदपूर, ता.पुसद, जि. यवतमाळ), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर आरोपी संतोष शिवाजी काळे (44, रा.पळसदे, ता. इंदापूर, जि.पुणे), ललिता दत्तात्रय राठोड (25, रा. जमशदपूर, ता. पुसद, जि. यवतमाळ), प्रवीण पल्हाद जाधव (33, रा. सिंगर, ता. डिग्रस, जि. यवतमाळ) यांना अटक करण्यात आली.


मयत दत्तात्रय राठोड यांच्यासह त्यांची पत्नी ललिता आणि तिचा भाऊ प्रवीण जाधव, हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. ते ऊस तोडणीसाठी कर्जत तालुक्यात आले होते. ऊसतोडणीचे काम करत असताना ललिताची संतोष काळे याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांच्यातील प्रेमसंबंधावरून दत्तात्रय राठोड पत्नी ललितावर संशय घेऊन मारहाण करत असे. बुधवार, 9 रोजी संतोष काळे हा ललिताला भेटण्यासाठी गेला होता. याचवेळी ललिताचा पतीही तिथे आला. त्याने याच कारणावरून पत्नीला मारहाण केली. या रागातून ललिता, तिचा प्रियकर संतोष आणि भाऊ प्रवीण, अशा तिघांनी दत्तात्रय राठोड यास मारहाण करत गळा दाबून ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह रात्रभर कोपीत ठेवला. दुसर्‍या दिवशी 9 जानेवारी रोजी सकाळी संतोष त्याची कार घेऊन आला. त्याने ललिताचा भाऊ प्रवीण याच्या मदतीने मृतदेह कारमध्ये घालून मिरजगाव शिवारात एका शेतातील खड्ड्यात अर्धवट अवस्थेत पुरला.


हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, अनंत सालगुडे, बबन मखरे, विश्वास बेरड आदींच्या पथकाने पुणे पोलिसांच्या मदतीने उघड केला.


तांत्रिक विश्लेषणात सदरचा गुन्हा संतोष काळे याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याचे समोर आले. त्याचा शोध घेत असताना तो पुण्यात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले. त्यामुळे खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला. त्याने प्रेमात अडसर ठरत असल्याने राठोड याचा खून केल्याची कबुली दिली.