जळगाव – जिल्ह्यातील तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहे. उत्तरेकडील थंड वार्यांमुळे तापमानात घट झाली असून जळगावमध्ये गारठा पुन्हा परतला आहे. जळगावचे सोमवारी 11 अंशावर असलेलं किमान तापमान मंगळवारी घसरून 8.2 अंशपर्यंत पोहोचले. आगामी दोन दिवस जिल्ह्यात थंडीचा जोर वाढून तापमानातही घसरण होणार आहे. 11 जानेवारीपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाचा अंदाज आहे.

पुन्हा पावसाची स्थिती
जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात थंडीचा कडाका वाढला. त्यानंतर पुन्हा फेंगल चक्रीवादळामुळे पावसाची स्थिती निर्माण होऊन थंडी गायब झाली. डिसेंबर महिन्याच्या दुसर्या तिसर्या आठवड्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढला. परंतु डिसेंबरच्या अखेरीस जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सावटामुळे थंडी पुन्हा कमी झाली होती. थंडीचा कडाका वाढला असून आज 8 ते 10 जानेवारीदरम्यान रात्रीच्या तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. रात्रीचा पारा 6 ते 7 अंशापर्यंत खाली जाऊ शकतो. 11 ते 15 जानेवारीपर्यंत पुन्हा जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाचीही शक्यता आहे. त्यानंतर 18 जानेवारीपासून पुन्हा जिल्ह्यात थंडीचा जोर वाढू शकतो.
रब्बी पिकांवर परिणाम
हवामानातील बदलामुळे रब्बी पिकांवर परिणाम होत आहे. एकीकडे थंडीच्या कडाक्यानंतर पुन्हा निर्माण होणार्या ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा, मका या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होत आहे. गव्हाच्या वाढीवर परिणाम होत आहे. ज्वारी, दादरवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. पूर्ण हंगामभर हेच वातावरण राहिले तर रब्बी हंगामाला मोठा फटका बसण्याचा अंदाज आहे


