हॅलो, अभिनंदन ! उद्या मंत्रिपदाची शपथ घ्यायचीये…फडणवीस फिरवणार फोन : गिरीश महाजनांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ?

मुंबई,

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी रविवारचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. उद्या दुपारी चार वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. भाजपमधून मंत्रिपद मिळणाऱ्या आमदारांना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: फोन करणार असल्याची माहिती आहे. शपथ घेण्यासाठी उपस्थित राहण्याच्या सूचना मिळाल्यावर यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदावर स्थान मिळण्याची शक्यता आहे, तर गिरीश महाजन यांना संघटनात्मक जबाबदारी मिळण्याचे संकेत मिळत असून त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनेच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्येच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राजभवनात संपूर्ण तयारी झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे सर्वाधिक 22 मंत्री असतील, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 12 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेतील. चार ते पाच मंत्री वगळता उर्वरित सर्व मंत्र्यांचा शपथविधी रविवारी पार पडणार आहे.

महाजन-चव्हाण यांच्यासाठी प्रयत्न

दरम्यान, जुन्या मंत्रिमंडळातील गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांच्या जबाबदारीत पक्षवाढीसाठी बदल करण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतल्याचे समजते. गिरीश महाजन यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्षपदाची, तर रवींद्र चव्हाण यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी देण्यात येणार आहे. रात्री उशिरापर्यंत या दोघांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा, म्हणून भाजप नेतृत्व दिल्लीतील शीर्षस्थ नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गिरीश महाजन हे मंत्रिमंडळात हवे आहेत मात्र दिल्लीतून काय निरोप येतो हे महत्त्वाचे आहे.

कुणाला काय मिळणार?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार असून, त्यांच्याकडे महसूल विभागाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. गृह मंत्रिपद भाजपकडेच राहणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ते कायम राहणार असल्याचे कळते.