गुजरात मधील जूनागड जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात जेतपूर-वेरावल महामार्गावर भंडुरी गावाजवळ सकाळी आठ वाजता घडला. कृष्णा हॉटेलजवळ भरधाव वेगात येणाऱ्या दोन कारची जोरदार टक्कर झाली, ज्यामुळे हा भयानक अपघात घडला. परीक्षा देण्यासाठी हे पाच विद्यार्थी कारमधून प्रवास करीत होते, मात्र वाटेतच त्यांना मृत्यूने गाठले. त्याचवेळी दुसऱ्या कारमध्ये प्रवास करणाऱ्या दोघांचा देखील मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

एका कारमध्ये बसलेले पाच कॉलेज विद्यार्थी परीक्षेसाठी निघाले होते. अपघात इतका भीषण होती की, या विद्यार्थ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुसऱ्या कारमध्ये बसलेल्या दोन व्यक्तींनाही प्राण गमवावे लागले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कारने डिव्हायडर पार करून समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात मृत व्यक्तींच्या शवविच्छेदनासाठी त्यांचे मृतदेह स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
याआधी 19 नोव्हेंबरला गुजरातच्या भरुच जिल्ह्यात मोठा अपघात झाला होता. या अपघातात दोन महिला आणि दोन मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला होता. तसेच गुजरातच्या पाटण जिल्ह्यात दिवाळीच्या दिवशी रामगड गावाजवळ ऑल्टो कार आणि छोटा हत्ती टेम्पो यांच्यात अपघात झाला होता. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधील वारंवार होणारे हे अपघात काळजीचे कारण बनले आहे.


