जळगाव – गिरणा पंपींग प्लॉट येथून जुनी पाईपलाईन जेसीबीद्वारे खोदून बीडच्या पाईपांची चोरी होत असताना यंत्रणेने धाव घेतल्याने चोरी टळली तर याप्रकरणी सोमवारी रात्री जळगाव महापालिका पाणीपुरवठा विभाग उपअभियंता योगेश प्रकाश बोरोले यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिसात सुनील महाजन यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. चौघांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
जळगाव शहर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश प्रकाश बोरोले यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवार, 2 डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ते जळगाव तालुक्यातील उमाळे येथील फिल्टर प्लॉन्ट येथे कामकाज पाहत असतांना त्यांना ओळखीच्या ठेकेदाराने फोन केला व सांगितले की, गिरणा पंपिंगजवळील आर्यन पार्क येथे पंपिंगवरून गेलेली जुनी पाईपलाईन जेसीबीच्या माध्यमातून खोदून काढली जात आहे. त्यानुसार योगेश बोरोले यांनी त्यांचे सहकारी पंप अटेंडंट नरेश चंद्रात्रे, मजूर अनिल रतन पाटील यांना घटनास्थळी बोलावून घेत मी पण तिथे येत असल्याचे सांगितले.
सायंकाळी 6.30 वाजता बोरोले हे सहकारी अभियंता शामकांत भांडारकर, विशाल सुर्वे, दीपक चौधरी हे देखील घटनास्थळी दाखल झाले. त्याठिकाणी जेसीबी क्रमांक (एम.एच.32 पी.3855) जवळ जेसीबी मालक नरेंद्र निवृत्ती पाणगडे (30), रोहन किशोर चौधरी (23, रा.शिरसोली) हे आढळले. यावेळी नरेंद्र पानगडेची चौकशी सुरू असतांना रोहन चौधरी याने पळ काढला. त्यानंतर थोड्या वेळाने तिथे अक्षय मनोज अग्रवाल (30, रा.भवानीपेठ, जळगाव) हा तिथे दाखल झाला. त्यावेळी नरेंद्र पानगडे याने चौकशीत पाईप लाईन ही अक्षय अग्रवाल, भावेश भानुदास पाटील (20, रा.मेहरूण), अमीन सलीम राठोड (35, रा.मच्छी बाजार, मेहरूण, जळगाव) यांच्या सांगण्यावरून खोदली आहे तसेच जेसीबी आणण्याबाबत अक्षय अग्रवाल यांच्या सांगण्यावरून आणल्याचे सांगितले. दरम्यान चौकशीत पाईपलाईन काढण्याबाबत कोणताही ठेका दिलेला नसल्याचे देखील चौकशीत समोर आले.
यावेळी अभियंता बोरोले यांनी खोदून काढलेले अडीच लाख रुपये किंमतीचे सहा बीडचे पाईप, अडीच लाख रुपये किंमतीचा जेेसीबी असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, जळगाव महापालिका पाणीपुरवठा विभाग उपअभियंता योगेश प्रकाश बोरोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अक्षय मनोज अग्रवाल (30 रा.भवानीपेठ, जळगाव), भावेश भानुदास पाटील (20, रा.मेहरूण, जळगाव), अमीन सलीम राठोड (35, रा.मच्छी बाजार, मेहरूण, जळगाव), नरेंद्र निवृत्ती पाणगडे (30, रा.शिरसोली, ता.जळगाव) या चार जणांविरोधात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला.

माजी मनपा विरोधी पक्ष नेत्याविरोधातही गुन्हा
अक्षय अग्रवाल याची या प्रकरणात चौकशी केली असता त्याने रोहन किशोर चौधरी यांच्या मध्यस्थीने जळगाव महापालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील सुपडू महाजन यांचे नावे सांगत आपण त्यांच्या सांगण्यावरून या पाईप लाईनचे खोदकाम केल्याची कबुली दिली. अक्षय अग्रवालच्या जबाबावरून रोहन किशोर चौधरी (23, रा.शिरसोली) व सुनील सुपडू महाजन (रा.मेहरूण, जळगाव) यांची नावे देखील गुन्ह्यात वाढविण्यात आली.
गुन्ह्यातील चार जणांना अटक व जामीन
या गुन्ह्यात अक्षय मनोज मनोज अग्रवाल, भावेश भानुदास पाटील, अमिन सलीम राठोड, रोहन चौधरी यांना अटक करण्यात आली. बुधवार, 3 नोव्हेंबर रोजी दुपारी चौघांना जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्या श्रीमती बढे यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता चौघांना जामीन मिळाला.
सुनील महाजन यांचा शोध तर एकास दिली नोटीस
दरम्यान, या घटनेत गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस कर्मचारी हे सुनील सुपडू महाजन यांच्या घरी गेले असता महाजन हे मिळून आले नाहीत तर नरेंद्र पाणगुडे याचा पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यांना न्यायालयीन नोटीस देण्यात आली.


