अमरावती – रेल्वे ट्रॅकमधील वेल्डिंग उखडल्यानंतर ट्रॅकमन लाल झेंडा घेवून तब्बल चारशे मीटर अंतर धावला व चालकाने ट्रॅकमन धोक्याचा इशारा देताना पाहून रेल्वे थांबवल्याने मोठा अपघात टळला
धामणगाव रेल्वेस्थानकाच्या पुढे डाऊन (बडनेरा ते नागपूर) बाजूला असलेल्या पोल क्र. 709 -0 ते 712 -0 दरम्यान ट्रॅकमधील वेल्डिंग उखडल्याचे गुरुवारी ट्रॅकमनच्या लक्षात आले. त्याचवेळी अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस सुसाट येत असल्याने ट्रॅकमनने लगेच लाल झेंडा हाती घेत समोरून येणार्या रेल्वेच्या दिशेने 400 मीटर धाव घेतल्याने आधीच एक्स्प्रेस थांबली. ट्रॅकमनच्या सतर्कतेने मोठा अपघात टळला.
धामणगाव रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या गौरक्षणकडील संतोषी माता मंदिराजवळ पोल क्र.709-0 ते 712-0 दरम्यान डाऊन लाइन मधील किमी 710 च्या 2628 मध्ये रेल्वे रुळावरील वेल्डिंग उखडल्याने 1 इंचाची भेग पडली होती. सकाळी रुळाला भेग पडल्याचे तपासणी करणारे ट्रॅकमन भोलराम मीणा यांच्या लक्षात आले. ही बाब त्यांनी वरिष्ठांच्या कानी घातली. मात्र काही क्षणांत अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस येत असल्याचे त्यांना दिसले. ट्रॅकमन मीणा यांनी क्षणाचाही विलंब न लावता लाल झेंडा हाती घेऊन रेल्वेच्या दिशेने धावणे सुरू केले. रुळाला भेग असलेल्या ठिकाणापासून 400 मी. आधीच गाडीला झेंडा दाखवून अहमदाबाद – पुरी एक्स्प्रेस रोखली. मोठा अनर्थ टळल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

रेल्वे प्रशासनाने लगेच ट्रॅक दुरुस्त करण्याचे कार्य सुरू केले. रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीसाठी 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागला. तोवर अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस खोळंबली. त्यामागे मुंबई-हावडा मेलही रेल्वेस्थानकावर उभी करण्यात आली होती.


