रावेर – शहरातील अॅक्सीस बँकेसमोर असलेल्या गाडीतून चोरट्यांनी पाच लाखांची रोकड लांबवली. याबाबत रावेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या घटनेने शहरातील व्यापारी वर्गात घबराट उडाली
मंगळवार, 19 रोजी भर दिवसा दुपारी रावेर येथील स्टेशनरोडवरील अॅक्सीस बँकेजवळ उभ्या असलेल्या वाघोदा येथील विशाल पाटील यांच्या काळ्या रंगाची इनोवा गाडी त(क्रमांक एम.एच.19 डी.व्ही.0666) लॅपटॉपच्या काळ्या रंगाच्या बॅगेत पाच लाख रुपये होते. विशाल पाटील गाडीत बसलेले असताना एका संशयिताने तुमची गाडी पंक्चर झाल्याचे सांगून त्यांना खाली उतरवण्यास भाग पाडले व लक्ष विचलीत करीत चोरट्यांनी पाच लाख रुपये असलेले बॅग लंपास केली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत विशाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.


