भुसावळात दिनेश टेन्ट हाऊसला भीषण आग : लाखो रुपयांचे नुकसान -शॉर्ट सर्किटने आगीचा अंदाज : रात्री उशिरापर्यंत आगीची धग कायम


भुसावळ – शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील राजस्थान मार्बलपासून काही अंतरावरील कला नगराजवळ असलेल्या दिनेश टेंट हाऊसच्या गोदामाला बुधवारी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत टेन्ट हाऊसचे साहित्य जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगीनंतर गोदाम परिसरातील रहिवासी धास्तावल्याने त्यांनी सुरक्षित जागी आश्रय घेतला. भुसावळ पालिकेसह दीपनगर येथील अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरूच होते. आगीचे ठोस कारण समोर आले नसलेतरी शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


भुसावळात कुशल राणे व सुशील राणे हे भावंडे गेल्या 50 वर्षांपासून टेंन्ट व्यावसायीक म्हणून काम करतात. राष्ट्रीय महामार्गावरील राजस्थान मार्बलजवळ त्यांचे दिनेश टेंट हाऊस म्हणून प्रशस्त गोदाम आहे. या गोदामात बुधवारी सायंकाळी सव्वापाच वाजेचे सुमारास आग लागली.
भुसावळचे माजी नगरसेवक पिंटू ठाकूर यांच्या टँकरने तीन ते चार फेर्‍या केल्या तसेच दीपनगर, वरणगाव व भुसावळ पालिकेच्या सुमारे दहा बंबांकडून रात्री उशिराने आगीवर नियंत्रण मिळवले.

भुसावळचे माजी नगरसेवक व साईसेवक पिंटू कोठारी यांनी आग विझवण्यासाठी मोठी धडपड केली. भुसावळ तहसीलदार निता लबडे, तलाठी पवन नवगाळे , जारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी धाव घैत पाहणी केली.