जळगाव गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : चोरीच्या दहा दुचाकींसह जामनेर तालुक्यातील तिघांना बेड्या -जळगावसह भुसावळ शहरातून चोरट्यांनी लांबवल्या दुचाकी :

जळगाव : जळगाव गुन्हे शाखेने अट्टल दुचाकी चोरट्यांना बेड्या ठोकल्या. विशाल गोपाल भोई (रा.टाकरखेडा, ता.जामनेर), देवानंद उर्फ आनंद भोजरंग सुरडकर, सुरज अशोक पारधी (साळुंखे, टाकरखेडा, ता.जामनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
विशाल गोपाल भोई हा चोरीची मोटरसायकल वापरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील यांना कळाल्यानंतर पथक त्याच्या मागावर होते. पोलीस पथकाने त्याला अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथून ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने त्याचे दोघे साथीदार देवानंद उर्फ आनंद सुरडकर आणि सुरज अशोक पारधी यांची नावे सांगितल्याने दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. दोघांच्या ताब्यातून चार लाख 33 हजार रुपये किंमतीच्या 10 चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.
आरोपींच्या ताब्यातून एमआयडीसी हद्दीतून चोरलेल्या पाच, भुसावळ शहर हद्दीतून चोरलेली एक तसेच जळगाव शहर व जिल्हापेठ हद्दीतून चोरलेली एक अशा आठ दुचाकी तसेच अन्य दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या दोन दुचाकींबाबत आरटीओ प्रशासनाकडून चेसीस व इंजिन क्रमांकाची माहिती मागवण्यात आली असून त्यानंतर या दुचाकींबाबत उलगडा होणार आहे.
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, गजानन देशमुख, विनोद पाटील, महेश महाजन, विष्णू बिर्‍हाडे, ईश्वर पाटील, रणजीत जाधव, राहुल महाजन आदींच्या पथकाने केली.