जळगाव जामोद –

गणपती विसर्जनाची मिरवणूक जल्लोषात सुरू असताना जळगाव जामोदमध्ये अचानक दगडफेक करण्यात आली. विशेष म्हणजे लाईट घालवून ही दगडफेक करण्यात आली. यावेळी मोठी अफरातफर झाल्याने पोलिसांना भक्तांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. तरीही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांना हवेत प्लास्टिकच्या गोळ्या झाडाव्या लागल्या. यामुळे जळगाव जामोदमध्ये रात्रभर तणाव होता.
मिळालेल्या माहितीनुसार , जळगाव जामोदच्या वायली वेस भागातील चौभारा रात्री 9 वाजता जल्लोषात गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरू होती. या रॅलीत महिला आणि तरुण मुलीही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. तेव्हा अचानक गावातील लाईट गेली. त्याचवेळी मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. एका उंच इमारतीच्या खिडकीतून ही दगडफेक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
प्लास्टिकच्या गोळ्या झाडल्या
दगडफेक झाल्याने गणेश भक्तांनीही दगडे भिरकावली. त्यामुळे धावपळ सुरू झाली. काहींनी तर वाहनांची तोडफोड सुरू केली. त्यामुळे या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. त्यामुळे जमाव अधिकच खवळला. आणखी वाहनांची तोडफोड सुरू झाली. जमाव अनियंत्रित झाल्याने पोलिसांनी हवेत प्लास्टिकच्या गोळ्यांचे पाच राऊंड फायर केले.
तगडा बंदोबस्त
तब्बल 150 ते 200 लोक अचानक समोर आल्याने पोलिसांना प्लास्टिकच्या गोळ्या झाडाव्या लागल्या. त्यामुळे जमाव पांगला. या दगडफेकीत वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकासन झाले आहे. त्यानंतर गावातील 15 गणपती मंडळांनी आक्रमक पवित्रा घेतला. जोपर्यंत दगडफेक करणाऱ्या समाजकंटकाला पकडले जात नाही, तोपर्यंत आम्ही गणपती विसर्जन करणार नाही, अशी मंडळांनी भूमिका घेतली. त्यामुळे पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली. या घटनेमुळे गावात रात्रभर तणावाचे वातावरण होते. जळगाव जामोदमध्ये सध्या तणावाचे वातावरण असून ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज ईद असल्याने या गावातील बंदोबस्त अधिकच वाढवण्यात आला आहे.
मिरवणूक थांबली
जोपर्यंत दगडफेक करणाऱ्या लोकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत विसर्जन होणार नाही, अशी भूमिका मंडळांनी घेतल्याने अडचण निर्माण झाली आहे.


