जळगाव – तालुक्यातील आसोदा या गावात ईलेक्ट्रीक मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या ४० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. ऐन अंगारखी चतुर्थीच्या दिवशीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संगिता मश्चिंद्र कुंभार वय ४० रा. आसोदा ता. जि. जळगाव असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. मयत महिलेच्या पश्चात पती, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे असोदा गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, संगिता कुंभार या महिला आपले पती व दोन मुलांसह जळगाव तालुक्यातील आसोदा गावात वास्तव्याला होत्या. मंगळवारी २५ जून रोजी सकाळी गावात नळाला पाणी आलेले होते. त्यांनी ईलेक्ट्रीक मोटार चालु केली होती. त्यावेळी ते पाणी भरत होते.
काही वेळाने विद्यूत पुरवठा खंडीत झाल्याने त्यांच्या पतीने मोटार बंद करण्याचे सांगितले. दरम्यान, संगिता कुंभार बटन बंद करण्यासाठी गेल्या तेवढ्यात विद्यूत पुरवठा अचानक सुरू झाला आणि त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सदर घटने नंतर पती मश्चिद्र कुंभार यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी धाव घेवून खासगी वाहनातून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहन दुगड यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


