२१ जून रोजी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे जागतिक योग दिनानिमित्त विशेष सत्राचे आयोजन”

भुसावळ –
संपूर्ण जगात २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. भुसावळ शहरात भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे सकाळी ६.०० ते ७.०० या वेळेत कोरोनेशन क्लबच्या मैदानावर त्यानिमित्त विशेष योगा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी आयुष मंत्रालय प्रमाणित योगा मास्टर ही लेवल -६ ची परीक्षा उत्तीर्ण पूनम कुलकर्णी उपस्थितांना मार्गदर्शन करतील.
भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे सदस्य आठवड्यातून ३ दिवस धावण्याचा, २ दिवस सायकलिंगचा तर १ दिवस स्नायू बळकटीसाठी योगाभ्यासाचा अभ्यास करत असतात. त्यामुळे या वर्षीच्या योग दिनानिमित्त आयोजित विशेष सत्रात धावल्यानंतर व सायकलिंगनंतर होणारी संभाव्य दुखापत टाळण्यासाठी कुठली आसने व व्यायामप्रकार करावा यावर विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती पूनम कुलकर्णी यांनी दिली. त्याशिवाय दैनंदिन जीवनात व्यायामाचे महत्व प्रत्येकास माहित आहेच, परंतु त्यामध्ये देखील नियमितता व विविधता असणे आवश्यक आहे, त्याबद्दल देखील मार्गदर्शन केले जाईल.
सदरच्या योग सत्रास भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे सर्व धावपटू,सायकलपटू व जलतरणपटू मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून भुसावळ शहरातील नागरिकांनी देखील याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्रमुख प्रा.प्रविण फालक यांनी केले आहे.