वरणगाव – येथील बस स्थानक चौक तिरंगा सर्कल येथे दुपारी शाळा भरताना आणि सुटताना ट्राफिक पोलिस आणि शाळेजवळ दामिनी पथक किंवा साध्या वेशातील पोलीस यांची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीचे निवेदन शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने बुधवार दि.१९ रोजी पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांना देण्यात आले.

शिवसेनेच्या वतीने पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 15 जून पासून शाळा, विद्यालय, महाविद्यालय सुरू झाले आहे. वरणगावसह परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनी वरणगाव येथे मोठ्या प्रमाणात शाळा महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दररोज ये-जा करत असतात. बसस्थानक चौक तिरंगा सर्कलजवळ दुपारी ११ ते १२ या वेळेत विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी आणि तिकडून शाळेतून घरी येण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ बस स्थानक चौक तिरंगा सर्कल येथे होत असते. त्यातच मोटरसायकल अवजड वाहन पायी चालणारे यांचे देखील या ठिकाणी गर्दी असते. गर्दीमुळे विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून चालणे मुश्किल होते. अशावेळी या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस नियुक्त केल्यास शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना वाट मोकळी होण्यास मदत होईल. दुचाकी वाहनधारकांमध्ये बऱ्याच वेळा या ठिकाणी शाब्दिक चकमक होऊन हाणामारी पर्यंत वाद होतो. तसेच राखेचे अवजड डंपर वाहन याच रस्त्यावरून जातात या ठिकाणी छोटे मोठे अपघात होतात. तिरंगा सर्कल चौकात ट्रॅफिक पोलीस नियुक्ती केल्यास या सर्व गोष्टी थांबतील.
जी. एस. चौधरी विद्यालय आणि महात्मा गांधी विद्यालय परिसरात शाळा भरतेवेळी व सुटतेवेळी रोड रोमिओ यांचा उच्छाद मोठ्या प्रमाणात असतो. या दोन्ही विद्यालयाजवळ साध्या वेशातील पोलीस किंवा दामिनी पथक यांची नियुक्ती केल्यास रोडरोमियोंमध्ये धाक निर्माण होऊन मुलींच्या छेडखानीचे प्रकार थांबतील. असेही पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावर तात्काळ अंमलबजावणी नाही झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी निवेदन देताना भुसावळ विधानसभा प्रमुख संतोष माळी, तालुकाप्रमुख विकास पाटील, संघटक प्रल्हाद माळी, सुनील देवघटोळे यांची उपस्थिती होती.



