भुसावळात विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार दाखले : तहसीलदार निता लबडे –

भुसावळ : विविध दाखल्यांसाठी शासकीय कार्यालयाचे हेलपाटे मारणे थांबणार असून आता प्रशासनाने शाळेतच दाखले देण्याचे नियोजन केले आहे. शहरातील शाळा, महाविद्यालयात तहसीलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्यात शाळेतच विद्यार्थ्यांना दाखल्याचे तत्काळ वितरण होईल. या अनुषंगाने 18 व 19 जून असे दोन दिवस शहरातील सहा शाळा व महाविद्यालयात शिबिर होईल.

विद्यार्थ्यांची फरफट थांबणार
18 जूनला नहाटा कॉलेज, डीएल हिंदी हायस्कूल व के. नारखेडे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय या तीन ठिकाणी होणार आहे तर 19 जूनला भोळे महाविद्यालय, कोटेचा महिला महाविद्यालय व महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव येथे होणार आहे. नायब तहसीलदार शोभा घुले, नायब तहसीलदार अंगद आसटकर, नायब तहसीलदार हेमंत गुरव हे शाळांमध्ये उपस्थित राहतील. विद्यार्थ्यांनी व पालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे अवाहन तहसीलदार निता लबडे यांनी केले आहे. बुधवारी तहसील कार्यालयात शहरातील सेतू केद्र चालक, मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.