तरुणाला ५ लाखांमध्ये तरुणींनी ऑनलाईन गंडविले -जळगांव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल :

जळगाव (प्रतिनिधी) – टेलिग्रामवर फेक आयडी तयार करुन, त्यात वेळोवेळी टास्क देऊन, त्या व्दारे पैसे देण्याचे आमीष दाखवत, शिरसोलीच्या २७ वर्षीय युवकाची तब्बल ५ लाखांमध्ये ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे.शुभम दिलीप लांबोळे (वय २७, रा.शिरसोली ता. जळगाव) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे.

या प्रकरणी शुभमच्या फिर्यादीवरुन दिव्या बस्सी व प्रिया शर्मा नामक युवतीवर जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभमला २८ व २९ मे दरम्यान व्हॉटसॲप व टेलिग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रिया शर्मा असे नाव सांगणाऱ्या युवतीने मेसेज पाठवून, संपर्क केला. त्यानंतर दिव्या बस्सी नामक युवतीनेही शुभमला वारंवार संपर्क केला. त्यानंतर त्याचा विश्वास संपादन करुन, त्याला वेगवेगळे टास्क पुर्ण करायला लावले. या टास्कमध्ये जर पैसे गुंतवले तर अधिकचा नफा होईल असे आमिष दाखविण्यात आले. या दरम्यान, युवकाने आपल्या बँकेच्या तीन वेगवेगळ्या अकाऊंटवरुन एकूण ५ लाख २३ हजार रुपयांची रक्कम त्यात भरली.

मात्र, त्यात झालेल्या नफ्याची रक्कम शुभमला शेवटी मिळालीच नाही. ५ लाख २३ हजार रुपयांपैकी केवळ २८०० रुपयेच शुभमला मिळाले. शेवटी संपर्क साधूनही ही रक्कम मिळत नसल्याने, काही वेळेनंतर हे अकाऊंट व फोन नंबर बंद झाल्यानंतर, शुभमला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शुभमने सायबर पोलिस ठाण्यात प्रिया शर्मा, दिव्या बस्सी या अज्ञात युवतींविरुध्द सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करत आहेत.