असे सोमेश्वर पुरातन ग्रंथाचे महाशिवरात्रीला प्रकाशन


भुसावळ (प्रतिनिधी )-
मुक्ताईनगर तालुक्यातील मेहूण-चिंचोल येथील रहिवासी व श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई आरतीचे रचयिता ऍड. गोपाल दशरथ चौधरी लिखित असे सोमेश्वर पुरातन या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा महाशिवरात्रीचे पर्व साधून शुक्रवार दि. 21 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 2 वाजता श्रीयज्ञेश्वर आश्रम मेहूण-चिंचोल येथे आयोजित करण्यात आला आहे.
वयाची 68 वर्ष पूर्ण केलेल्या व 90 टक्के अंध असलेल्या ऍड. गोपाल चौधरी यांनी आयुष्यभर केलेल्या संत साहित्य अभ्यासाच्या बळावर तोंडी सांगावे आणि त्यांची पत्नी सौ. सुलोचना चौधरी यांनी लिहून घ्यावे अशा पद्धतीने या आधीसुद्धा ऐतिहासिक संत आदिशक्ती मुक्ताई लेखन झाले आहे. श्रीसंत मुक्ताई गुप्तस्थळाचे, श्रीक्षेत्र मेहूण तापीतीराचे महत्त्व अधोरेखित व्हावे म्हणून असे सोमेश्वर पुरातन या ग्रंथाचे लेखन ऍड. चौधरी यांनी केले आहे. श्रीस्कंदपुराणात वर्णन केलेला सोमेश्वर, श्रीसंत नामदेवांनी सांगितलेला सोमेश्वर आणि श्रीक्षेत्र मेहूण तापीतीर येथे असलेला सोमेश्वर हा एकच आहे, हे त्यांनी या ग्रंथातून पटवून दिले आहे. ग्रंथाच्या प्रकाशनाची जबाबदारी हभप लक्ष्मण महाराज चिखलीकर यांनी स्वीकारली असून ग्रंथासाठी हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महाशिवरात्रीचे पर्व साधून शुक्रवार दि. 21 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 2 वाजता श्रीयज्ञेश्वर आश्रम मेहूण-चिंचोल ता. मुक्ताईनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. उपस्थितीचे आवाहन ऍड. गोपाल चौधरी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *