बोदवड महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागातर्फे व्याख्याने संपन्न :

बोदवड – येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी विकास कक्षाद्वारे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्ताने राष्ट्रध्वज संचलन आणि विविध विषयांवर मान्यवरांच्या व्याख्यानांचे आयोजन दिनांक 13 ऑगस्ट रोजी महाविद्यालयात करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी होते. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अजय पाटील यांनी प्रास्ताविकातून गेल्या 75 वर्षांमध्ये भारताने सर्वच क्षेत्रात लक्षवेधी प्रगती केली आहे. त्या अनुषंगाने “भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षातील व्यापार आणि औद्योगिक प्रगती”, “वैज्ञानिक प्रगती”, “भारतीय राजकारणाची वाटचाल” आणि “सुवर्ण भारताच्या प्रगतीस मारक ऐतिहासिक गुलामगिरी आणि राजकीय, शास्त्रज्ञ व समाज सुधारकांच्या हत्या” या चार विषयांना घेऊन व्याख्यानांचे आयोजन केले आहे असे सांगितले.
वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. प्रभाकर महाले यांनी स्वातंत्र्योत्तर 75 वर्षांमध्ये भारताने व्यापार व औद्योगिक क्षेत्रात उत्तम प्रगती केली आहे असे वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनांचे उदाहरण देऊन स्पष्ट केले. स्वातंत्र्यापूर्वीचा व्यापार आणि स्वातंत्र्योत्तर व्यापारामध्ये आमुलाग्र बदल घडून आला. त्याला संगणकीकरण, दळणवळण साधने, भारताची वाढती लोकसंख्या, विविध उत्पादनांची मागणी, रोजगार आणि भारत सरकारने उचललेली सकारात्मक पावले इत्यादी बाबी सोदाहरण स्पष्ट केले.

रसायनशास्त्र प्रमुख प्रा. नरेंद्र जोशी यांनी भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षातील वैज्ञानिक प्रगतीचा आढावा घेत असताना अगदी पृथ्वीवरील मानवाचे प्रकटन, पौराणिकशास्त्र त्यातील ऋषीमुनींनी आयुर्वेदिक क्षेत्रात मांडलेले विविध उपाय, औषधे आणि त्यांचे शरीरशास्त्र वगैरे पासून सुरुवात केली. अश्मयुगातील शेती, अन्न, वस्त्र आणि निवारा इत्यादी बाबींचा उलगडा करत अगदीच संगणकीय क्षेत्रातील प्रगती, अंतराळात भारताचा यशस्वी प्रवेश, अणुबॉम्ब चाचण्या, ऑटोमिक एनर्जी, भाकरा नांगल ची बांधणी एवढेच नव्हे तर कोरोना काळातील कोविशील्ड ची लस निर्मिती तर भारतीय उत्पादनापर्यंत विस्तृत दाखले देऊन स्पष्ट केले. हे उद्बोधित करत असताना त्यांनी अंतराळ क्षेत्रामध्ये भारत मागे नसून मंगळयानाद्वारे एकच वेळेला बारा सॅटॅलाइट सोडणारा भारत हा जगात प्रथम देश ठरलेला आहे असेही सांगितले. औष्णिक क्षेपणास्त्रामध्ये असलेली भारताची प्रगती अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळेच संपूर्ण जग हे भारताला एक महासत्ता म्हणून बघत आहे असेही नमूद केले.

मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनोज निकाळजे यांनी “स्वातंत्र्याच्या 75 वर्षातील राजकीय वाटचाल” या विषयावर भाष्य करताना पंडित नेहरूंपासून ते आजतागायत झालेल्या पंतप्रधानांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला. संसदीय लोकशाही अवलंबलेला भारत हा जगातील सर्वात मोठा देश आहे. 75 वर्षात भारतीय राजकारणामध्ये अनेक स्थित्यंतर आली आणि सत्तांतर सुद्धा झाले असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यातील दोन महत्त्वांच्या बाबींवर त्यांनी मागोवा घेतला त्यात 1977 मधील आणीबाणी राजकारणातील ओबीसीचे आरक्षण आणि मंडल आयोगाची अंमलबजावणी यावर सखोल प्रकाश टाकला.

उप प्राचार्य डॉ. विनोद चौधरी यांनी सुवर्ण भारताच्या प्रगतीस मारक ऐतिहासिक गुलामगिरी राजकीय, शास्त्रज्ञ व समाज सुधारकांच्या हत्या या विषयावर विचार व्यक्त करताना भारतीय खंडाला लाभलेली हजार वर्षाची गुलामगिरी, ब्रिटिशांनी भारतीय खंडाचे अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, तिबेट, श्रीलंका, म्यानमार (बर्मा) व पाकिस्तान अशा रीतीने केलेले विभाजन तसेच महात्मा गांधी, नेताजी सुभाष चंद्र बोस, डॉ. होमी भाभा, इंदिरा गांधी, राजीव गांधी तसेच समाजसुधारक व विचारवंत यांच्या झालेल्या सामाजिक व राजकीय हत्या, भारतामध्ये कुतुब मिनार व विविध ऐतिहासिक लेण्या घडविण्याचे सामर्थ्य असताना सुद्धा देशाच्या प्रगतीस व अखंडतेस मारक ठरलेल्या आहे.

प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन केले. सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अजय पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थी महिला विकास अधिकारी डॉ. रूपाली तायडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.