भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन रेल्वे क्रीडांगणावर करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि वेळेत सकाळी सहा वाजता कार्यक्रम सुरू होऊन सकाळी सात वाजता संपला . या कार्यक्रमात सुरुवातीला भुसावळ शहरातील एकमेव योगामास्टर पुनम कुलकर्णी यांनी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या सर्व धावपटू, जलतरणपटू, सायकलपटू व शहरातील इतर नागरिकांना आंतरराष्ट्रीय योग दिवस का साजरा केला जातो व मानवाच्या आयुष्यात योगाचे काय महत्त्व आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली.
त्यानंतर प्रत्यक्ष योगाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर योगशिक्षिका पुनम भंगाळे, योगशिक्षिका ज्योत्स्ना पाटील व योगशिक्षिका पारुल वर्मा या उपस्थित होत्या
त्यांनी आपल्या वेगवेगळ्या आसनांच्या कृतीद्वारे उपस्थितांना योगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी प्रथम वाॅर्मअप, त्यानंतर स्टॅंडिंग योगा, सूर्यनमस्कार, सिटिंग योगा व शेवटी प्राणायाम व ध्यान अशा पद्धतीने योगाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योगाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे प्रमुख प्रवीण फालक यांच्या हस्ते पुनम कुलकर्णी यांना आयुष मंत्रालयाची लेव्हल -6 ही परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल विशेषत्वे गौरविण्यात आले. यावेळी सर्व उपस्थितांनी पूनम कुलकर्णी यांचे हार्दिक अभिनंदन केले. यावेळी प्रवीण फालक यांनी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे आयोजित अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध योग दिवसाचा कार्यक्रम साजरा केल्याबद्दल सर्व सदस्यांचे विशेष कौतुक केले व उपस्थितांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. नीलिमा नेहेते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिलेशकुमार कनोजिया, रिजवान शेख, सुनील सोनगिरे, छोटू गवळी यांनी विशेष सहकार्य केले.


