भुसावळ – येथील छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे 6 जून शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष संजीव पाटील व सौ. रंजना पाटील यांनी पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. संस्था उपाध्यक्ष डि.के. पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील एक अनन्यसाधारण अशी घटना म्हणजेच शिवराज्याभिषेक होय. यानंतरच स्वराज्यास एक तात्त्विक बैठक मिळून शिवरायांचे हे एक केवळ मराठ्यांचे बंड नसून सार्वभौम राज्याची स्थापना आहे हे या राज्याभिषेकाने पटवून दिले. शिवरायांनी तरूणांना एकत्रित करून त्यांना आश्वासक नेतृत्व देण्याबरोबरच त्यांची बलस्थाने ओळखून त्यांच्यावर योग्य त्या जबाबदाऱ्या सोपविल्याचेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेचे सचिव डॉ. जगदीश पाटील यांनी मानले. यावेळी शिवप्रेमी मंडळी उपस्थित होती.



