बीड – एका तरुणानं तुरुंगात बसून पाच देशातील नागरिकांना कोट्यवधी रुपयाचा चुना लावून गंडविल्याचा धक्कादायक आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे शिक्षा भोगत असलेल्या तुरंगातील तरुण आरोपीला तुरंगा मधीलच काही अधिकारी आणि काही कर्मचारी यांनी काही इलेक्ट्रॉनिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी मदत करून सहकार्य केले असल्याचे खुद्द तुरुंगातीलच शिक्षा भोगणाऱ्या आरोपीने चौकशी अधिकाऱ्यांना सांगितल्याचे बोलले जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की बीड येथील रहिवासी असणाऱ्या एका तरुणानं तुरुंगात बसून पाच देशातील नागरिकांना गंडा घातला आहे.
सायबर गुन्ह्याअंतर्गतच शिक्षा भोगणाऱ्या तरुणानं विविध देशातील नागरिकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याची बाब उघड झाली आहे.
विशेष म्हणजे संबंधित तरुणानं हा गुन्हा दोन तुरुंग अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांच्या दबावामुळे केल्याचं म्हटलं आहे.त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठे हवाला रॅकेट समोर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
अमर अनंत अग्रवाल असं शिक्षा भोगणाऱ्या आणि कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या तरुणाचं नाव असून तो बीड येथील रहिवासी आहे. पण एका फसवणुकीच्या प्रकरणात तो तरुण सन २०१८ पासून मध्य प्रदेशातील “भैरवगड” कारागृहात शिक्षा भोगत आहे.संबंधित तरुण हॅकर असल्याने तुरुंगातील अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांनी संधी साधून त्याच्यावर दबावतंत्र आणि अधिकाराचा दुरुपयोग करून जबरदस्ती करत,हा आर्थिक घोटाळा करण्याचे काम करायला भाग पाडल्याचा दावा आरोपी तरुणानं पोलीस चौकशीत केला आहे.
यासाठी तुरुंगातील अधिकाऱ्यांनी तुरुंगातील आरोपी तरुणाला काही क्रेडिट कार्डस आणि लॅपटॉप उपलब्ध करून दिले होते. याच माध्यमातून आरोपीनं तुरुंगात बसून अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. आरोपीनं परदेशातील लोकांची बँक खाती हॅक करून त्यातील रकमेची अफरातफर केली आहे. त्याने अनेक पंचतारांकीत हॉटेलांना देखील अशाच प्रकारे गंडा घातला आहे. सदरची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला भोपाळ येथील तुरुंगात हलवलं आहे.
अमर अग्रवाल याने ऑनलाइन गंडा घालून हे पैसे हवालाच्या माध्यमातून फिरवल्याचा संशय पोलिसांना आहे.यातील काही पैसे संबंधित जेलच्या अधिकाऱ्यांना सुद्धा मिळाले तर काही पैसे अमरने स्वतःसाठी फिरवल्याचा संशय आहे.
बीड मध्येही हवालाचे पैसे आल्याचा संशय पोलिसांना आहे. या अनुषंगाने पोलीस घटनेचा पुढील तपास आणि चौकशी करीत आहेत.या घटनेमुळे मात्र महाराष्ट्र-मध्यप्रदेशसह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.


