जळगाव –

शेंदुर्णी-पहुर रस्त्यावरील गोंदेगाव गावाजवळ आयशर चालकासह क्लीनरला मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना 30 जून रोजी रात्री घडली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेने चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. शुभम प्रकाश बारी (20, रा.वाडी दरवाजा, शेंदुर्णी), रोशन दत्तात्रय बडगुजर (19, रा.सोयगाव रोड, पाण्याच्या टाकीजवळ, शेंदुर्णी, ता.जामनेर), गोरख बापू पाटील (19, रा.वाडी दरवाजा, शेंदुर्णी) व अक्षय प्रकाश पाटील (20, रा.संजयदादा नगर, शेंदुर्णी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
शेंदुर्णी ते पहुर रोडवरील गोंदेगाव गावाजवळ 30 जून 2021 रोजी रात्री चालक दशरथ बबन बागुल (35, रा.दहिवद, ता.चाळीसागाव) हे आयशर (एम.एच.10 डब्ल्यू 735) ने जात असताना पाच अनोळखी व्यक्तींनी दुचाकी आडवी लावून वाहनाचे हेड लाईट फोडत ड्रायव्हर आणि क्लिनरला मारहाण करीत त्यांच्याकडील आठ हजार रुपये हिसकावून पळ काढला होता.याबाबत पहुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक महाजन, शरीफ काझी, युनुस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजीत जाधव, चालक इद्रीस पठाण यांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींनी दरोड्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली तर चौघांना पहूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


