खडसे सोबत राष्ट्रवादीत येणाऱ्या सर्व भाजप कार्यकर्त्यांना संरक्षण देणार ; -जलसंपदा मंत्री जयंत पाटील; भुसावळात राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार संवाद मेळावा संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी )- निवडणुकांमध्ये यश मिळवायचे असेल तर लोकांपर्यंत पोहचणे गराजेचे आहे. या भागातील जनसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी आलो आहे. या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे काम चांगल्या प्रकारे सुरु असून प्रतिकूल परिस्थिती असतांना चौधरी यांनी पक्षाचे काम सुरु ठेवले आहे. आता एकनाथराव खडसे पक्षात आल्याने चिंतेचे कारण नाही. आपण सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असून खडसे सोबत राष्ट्रवादी पक्षात दाखल होणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांनाही विश्वासात घेण्यात येईल असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
येथील तेली समाज मंगल कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा परिवार संवाद मेळावा आज पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आ. संतोष चौधरी,माजी आ. मनीष जैन, आ.अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, माजी आ. डॉ. गुरुमुख जगवाणी, युवक प्रदेेशाध्यक्ष मेहबुब खान, माजी जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, युवक जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत निळ, महानगर जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, युवती जिल्हाध्यक्ष कल्पीता पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्री पाटील म्हणाले की, खडसेंवर गेल्या पाच वर्षांपासून अन्याय होता आहे हे आपण सुरुवातीपासून म्हणत आलो आहे. स्वाभिमानी असलेल्या या नेत्याने आता राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आहे. सक्षम तसेच जनाधार असलेला नेता म्हणून नाथाभाऊंची ओळख आहे. भुसावळ शहरातला प्रश्न गंभीर असून या प्रश्नांना नाथाभाऊ व चौधरी यांनी मिळून गती देण्याची गरज आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन काम करा अश्या सूचना देत, खान्देशात आपण बेरजेचे राजकारण सुरु केले असून एकनाथराव खडसे पक्षात आल्याने चिंता मिटली
असल्याचेही ते म्हणाले. शिवसेना व काँग्रेस हे देखील महाविकास आघाडी सराकाचे घटक असल्याने त्यांनाही सोबत घेत महाविकास आघाडीच्या भावनांना छेद पडणारा नाही असे काम करा अश्या मार्मिक सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या .
यावेळी माजी मंत्री खडसे म्हणाले की, आगामी काळात खान्देशासह महाराष्ट्रात राष्ट्रवादी एक क्रमांक असलेला पक्ष होईल यात तिळमात्र शंका नाही गेल्या कालावधीत आपण कुठे कमी पडलो किंवा जास्त पडलो यापेक्षा सर्वांनी सोबत घेऊन संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत , असे आवाहन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. पक्ष संघटनांच्या दृष्टीतून प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे मोठी जबाबदारी असते ती म्हणजे दोन विरोधकांना एकत्र आणण्याची. आमच्यातील नाते सर्वांनाच ठाऊक आहे, त्यामुळे पक्षासाठी जुने वाद विसरून सोबत काम करणाऱ तसेच एकत्र येवून काम करण्यासाठी दोन पाऊले पुढे व मागे टाकावे लागतात , भुसावळचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत मात्र त्यांच्या काही अडचणी आहेत
गेल्या 40 वर्षांपासून भाजपासाठी संघर्ष केला. पक्षासाठी संघर्ष करून देखील माझ्यावर अन्याय झाला, जे मला झाले नाही ते उद्या कुणाला काय होणार? अशा असुरक्षित भावनेमुळेच भाजपमधील अनेक पदाधिकारी आता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे. ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असून, त्यांच्यातील ज्या काही शंका आहेत त्या आपल्याला दूर कराव्या लागतील. भुसावळात भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे नवा जुना वाद होऊ नये यासाठी संघटनात्मक दृष्टीने सर्वांना विश्वासात घेऊन, एकत्र आले पाहिजे, असे आवाहन श्री. खडसे यांनी केले.आगामी काळात तुम्ही सचिनला पुढे आणा आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत , असे सांगत सचिन चौधरीं यांना राजकारणात अधिक सक्रिय करण्याचे सांगितले .
जिल्ह्यातून 4-5 आमदार निवडून आणणार- संतोष चौधरीं
गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा एबी फॉर्म गायब झाल्याने भुसावळ विधानसभेची जागा हातची गेली. मात्र आता नाथाभाऊ आणि आम्ही एकत्र आल्यामुळे आगामी निवडणुका एकत्रच लढून जिल्ह्यात पाच ते सहा आमदार राष्ट्रवादीचे निवडून देऊ असे आश्वासन माजी आमदार संतोष चौधरी यांनी याप्रसंगी दिले. तसेच भुसावळ पालिका निवडणुकीत 48 पैकी 41 नगरसेवक निवडून आणू वरणगाव पालिकेत तर भाजपला खातेच उघडू देणार नाही असा ठाम विश्वासही चौधरी यांनी व्यक्त केला . भुसावळ शहरात अठरा वर्षात गुन्हेगारी मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून पोते भरून बंदुका शहरात निघत आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांचे बैठक लावून शहरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी देखील मंत्री महोदयांकडे केली.
शहराची रत्यांसह झालेली दुरावस्ता लवकरच दूर करु तसेच शहरवासियांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे याकरीता श्री साईबाबा मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून सिंगापूर पँटर्न राबविणार असल्याचे माजी आमदार संतोष चौधरीं यांनी सांगितले यात आरोग्यासाठी करणाऱ्यास जेवढे वजन कमी केले त्या वजनानुसार सोने देण्यात येईल .एक किलो वजन कमी एक ग्रम सोने तर दहा किलो वजन कमी करणाऱ्यास दहा ग्रम सोने मंदिर ट्रस्ट तर्फे देण्यात येईल या स्पर्धेत वजन कमी करण्यासाठी मी देखील सहभागी होणार असल्याचे जाहिर केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *