चाळीसगाव –
2019 च्या विधानसभा निवडणुकीत आपण चाळीसगावात चार हजार मतांनी पराभूत झालो परंतु 2024 च्या निवडणुकीत याची परतफेड करा व राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बहुसंख्य मतांनी निवडून आणा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या परीवार संवाद यात्रेला मंगळवारी संबोधित करताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे केले. राष्ट्रवादी परीवार संवाद यात्रेच्या निमित्तानं मंगळवार रोजी पाटील जळगाव जिल्ह्यात आले आहेत. चाळीसगावी पाटील यांनी कार्यकर्ते व पदाधिकार्यांना मार्गदर्शन केलं. ‘राष्ट्रवादी परिवार संवाद हा कुटुंबातला संवाद आहे. या संवादाच्या माध्यमातून काही सूचना याव्यात आणि त्यातून पक्षाच्या संघटनेत सुधारणा व्हावी यासाठी हे अपेक्षित आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह माजी आमदार राजीव देशमुख, माजी मंत्री गुलाबराव देवकर व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक पदाधिकार्यांनी पक्षात प्रवेश केला.



