भुसावळात 168 फुकट्या प्रवाशांकडून लाखाचा दंड वसुल ; 16 तिकीट तपासणी कर्मचार्‍यांसह आठ आरपीएफ कर्मचार्‍यांनी केली कारवाई ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना काळात आरक्षीत रेल्वे धावत असल्यातरी फुकट्या प्रवाशांकडून नियमांचे उल्लंघण करून प्रवास सुरू असल्याने अशा प्रवाशांविरुद्ध कारवाईसाठी पथक निर्माण करण्यात आले असून या पथकाने भुसावळात शनिवारी धडक मोहिम राबवत 168 केसेसच्या माध्यमातून 98 हजार 65 रुपयांचा दंड वसुल केला. दंड भरण्यात असमर्थ असणार्‍या दोन प्रवाशांवर रेल्वे अ‍ॅक्ट 144 व अन्य दोन प्रवाशांवर रेल्वे अ‍ॅक्ट 147 नुसार कारवाई करण्यात आली. या कारवाईने फुकट्या प्रवाशांच्या गोटात मोठी खळबळ उडाली.
भुसावळचे वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार व विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी.अरुणकुमार आणि सहायक वाणिज्य प्रबंधक (टी.जा.) अनिल पाठक, विशेष तिकीट तपासणी निरीक्षक वाय.डी.पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ रेल्वे स्थानकावर शनिवारी विशेष तिकीट तपासणी मोहिम राबवण्यात आली. त्यात 68 अनियमित प्रवाशांकडून 98 हजार 65 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. या मोहिमेत 16 तिकीट तपासणी कर्मचारी आणि 08 आरपीएफ स्टाफ सहभागी झाले.
रेल्वे प्रवाशांनी आरक्षीत गाड्यांमध्ये प्रवास करताना केवळ कन्फर्म तिकीट असल्यानंतरच प्रवेश करावा तसेच कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. विना तिकीट प्रवास करणार्‍यांवर यापुढेदेखील अशाच पद्धत्तीने धडक मोहिम राबवून कारवाई केली जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *