जळगाव जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची ई-मेलद्वारे धमकी; शहरात खळबळ!बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून न्यायालय परिसराची कसून तपासणी; संशयास्पद वस्तू आढळली नाही – पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. या धमकीची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने हालचाली करत न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था सतर्क केली.

धमकीच्या पार्श्वभूमीवर बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) यांना तातडीने पाचारण करण्यात आले. या पथकाने न्यायालयाची संपूर्ण इमारत तसेच आजूबाजूच्या परिसराची बारकाईने तपासणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून ही तपासणी मोहीम राबविण्यात आली.

दरम्यान, तपासणीदरम्यान न्यायालय परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आली नसल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले. धमकीचा ई-मेल प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने सुरक्षा यंत्रणा सक्रिय करून आवश्यक ती खबरदारी घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.

या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, धमकीचा ई-मेल कोठून पाठविण्यात आला, त्यामागे कोणाचा हात आहे आणि धमकी देण्यामागील नेमका उद्देश काय, याचा शोध घेणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.