भुसावळ (प्रतिनिधी) : येथील पुंडलिक गणपत बऱ्हाटे माध्यमिक विद्यालयात शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तालुका विधी सेवा समिती, भुसावळ यांच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांना तसेच उपस्थितांना विविध कायदे, शासकीय कल्याणकारी योजना आणि सामाजिक विषयांबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात तालुका विधी सेवा समितीच्या वतीने ॲड. जास्वंदी भंडारी यांनी मार्गदर्शन करताना दिव्यांग व्यक्ती आणि शासकीय कल्याणकारी योजनांमधील दरी दूर करण्याची आवश्यकता स्पष्ट केली. दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची ओळख, योजनांची माहिती, आवश्यक कागदपत्रे तसेच प्रत्यक्ष लाभ मिळविण्याची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली.
तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध कायदेशीर समस्यांवर मोफत कायदेशीर सल्ला, मार्गदर्शन व विधी सेवा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. व्यावसायिक वादांमध्ये न्यायालयात खटला दाखल करण्यापूर्वीच परस्पर सामंजस्याने वाद मिटविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या पूर्वसंस्थात्मक मध्यस्थी व तडजोड (PIMS) प्रक्रियेचे महत्त्वही त्यांनी विशद केले.
सायबर सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने ऑनलाइन आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हे, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले. याशिवाय 'बालविवाह मुक्त भारत' अभियान, पोक्सो कायदा २०१२ आणि 'सुरक्षित बालपण' अभियानांतर्गत बालकांचे अधिकार, बालकांचे संरक्षण, बालविवाहाचे दुष्परिणाम आणि कायद्यातील तरतुदी याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख पाहुणे म्हणून तालुकाध्यक्ष तथा माजी मुख्याध्यापक जयंत चौधरी सर उपस्थित होते. व्यासपीठावर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक पी. जे. चौधरी, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. हेमांगिनी चौधरी, ॲड. जास्वंदी भंडारी तसेच पत्रकार व पीएलव्ही उज्वला बागुल उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पीएलव्ही उज्वला बागुल यांनी तालुका विधी सेवा समितीच्या कार्याची, समितीमार्फत नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या मोफत विधी सेवांची तसेच सायबर सुरक्षा सप्ताहांतर्गत सुरू असलेल्या विविध जनजागृती उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी प्रमुख पाहुणे जयंत चौधरी सर आणि मुख्याध्यापक पी. जे. चौधरी यांनी विधी सेवा समितीच्या जनजागृतीपर उपक्रमांचे विशेष कौतुक केले. ॲड. जास्वंदी भंडारी यांनी केलेल्या कायदेविषयक मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना कायद्याची जाणीव झाली असून, या मार्गदर्शनातील बाबींची प्रत्यक्ष जीवनात अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षिका सौ. चैताली योगेश पाचपांडे यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती जयश्री चौधरी, श्रीमती नीलकमल भोळे, शिक्षक दीपक तायडे, प्रदीप परखड, समीर तडवी, शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती दीपाली सरोदे यांच्यासह विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कायदेविषयक जागरूकता, सामाजिक जबाबदारी आणि विद्यार्थ्यांचे संरक्षण या दृष्टीने हे मार्गदर्शन शिबिर उपयुक्त ठरले.