भुसावळसह आठ प्रमुख रेल्वे स्थानकांवर कारवाई; विनातिकीट प्रवास, अनधिकृत प्रवेश आणि विक्रीविरोधात रेल्वे प्रशासनाची धडक मोहीम भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून विनातिकीट तसेच अनधिकृत प्रवासाला आळा घालण्यासाठी विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने २८ ऑक्टोबर २०२६ रोजी विभागांतर्गत आठ प्रमुख रेल्वे स्थानकांवर विशेष ‘फोर्ट्रेस तिकीट तपासणी मोहीम’ राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण ३३१ प्रकरणांमध्ये कारवाई करून तब्बल ३ लाख ७ हजार ६२५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या विशेष मोहिमेत भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, मनमाड, खंडवा, अकोला, बडनेरा आणि अमरावती या आठ प्रमुख रेल्वे स्थानकांचा समावेश होता. प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, विनातिकीट आणि अनधिकृत प्रवासाला आळा बसावा, तसेच रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध व्हावा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. या मोहिमेत मुख्य वाणिज्य निरीक्षक, वाणिज्य पर्यवेक्षक, तिकीट तपासणी कर्मचारी तसेच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान सहभागी झाले होते. तपासणीदरम्यान विनातिकीट प्रवास, अनियमित तिकीट आणि विनाबुक केलेले सामान अशा विविध प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. रेल्वे कायद्यांतर्गतही कारवाई तिकीट तपासणी मोहिमेसोबतच रेल्वे कायदा १९८९ मधील विविध कलमांनुसारही कारवाई करण्यात आली. त्यामध्ये पुढीलप्रमाणे प्रकरणांचा समावेश आहे. - कलम १४५ (ब) – अस्वच्छता पसरविणे : एका प्रकरणात कारवाई करून १ हजार रुपयांचा दंड वसूल. - कलम १४७ – अनधिकृत प्रवेश व अतिक्रमण : १८ प्रकरणांमध्ये कारवाई करून ९ हजार रुपयांचा दंड वसूल. - कलम १४४ – अनधिकृत विक्री : एका विक्रेत्याविरुद्ध कारवाई करून २ हजार रुपयांचा दंड वसूल. - कलम १५९ – धूम्रपान : एका प्रकरणात कारवाई करून ५०० रुपयांचा दंड वसूल. वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रवासादरम्यान अनावश्यक गैरसोय आणि दंड टाळण्यासाठी प्रवाशांनी नेहमी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा. तसेच रेल्वे परिसरात स्वच्छता राखावी, रेल्वेच्या नियमांचे पालन करावे आणि अनधिकृत प्रवेश किंवा विक्रीसारख्या प्रकारांपासून दूर राहावे, असे आवाहन भुसावळ विभागाकडून करण्यात आले आहे. प्रवाशांना रेल्वे स्थानकांवरील आरक्षण व तिकीट खिडक्या, अधिकृत तिकीट विक्रेते, स्वयंचलित तिकीट विक्री यंत्रे (ATVM), IRCTC चे अधिकृत संकेतस्थळ तसेच मोबाईलवरील ‘रेल वन’ (RailOne) ॲपद्वारे तिकीट उपलब्ध करून घेता येणार आहे. प्रवाशांचा सुरक्षित, स्वच्छ आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी अशा विशेष तिकीट तपासणी मोहिमा यापुढेही प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



