भुसावळ/कंडारी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत तालुका विधी सेवा समिती, भुसावळ यांच्या वतीने मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी कंडारी येथील स्व. विजयाबाई शंकरलाल न्याती हायस्कूलमध्ये पॉक्सो (POCSO) कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा सूर्यभान पाटील यांनी प्रमुख वक्ते ॲड. अभिजीत मेने आणि पॅरालीगल व्हॉलेंटिअर (पीएलव्ही) जयश्री इंगळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी तालुका विधी सेवा समितीचे पॅनल वकील ॲड. अभिजीत मेने यांनी विद्यार्थिनींना लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम, २०१२ (पॉक्सो कायदा) याविषयी सविस्तर माहिती दिली. बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण, कायद्याच्या तरतुदी तसेच अशा घटनांबाबत जागरूक राहण्याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थिनींना समजावून सांगितले. त्यानंतर मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा सूर्यभान पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पीएलव्ही जयश्री इंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. शिबिरादरम्यान उपस्थित विद्यार्थिनींना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजनांची माहिती देणारी पत्रकेही वितरित करण्यात आली. या कार्यक्रमाला उपशिक्षिका माधुरी अनिल जावळे, ललित यशवंत बहाळे, संदीप रुपचंद पाटील, दीपक बाळकृष्ण जवर, बबिता सलीम तडवी, लिपिक दुशांत बाळू नायदे, शिपाई भारत मोहन चौधरी यांच्यासह शाळेतील मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


