शिंदी परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा; नवीन सुरवाडे एजी फिडरचे काम पूर्ण ;

भुसावळ (प्रतिनिधी/उज्वला बागुल)- तालुक्यातील शिंदी परिसरातील शेतकरी वर्गासाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी असून, शेतीपंपांना सुरळीत वीजपुरवठा मिळण्यासाठी उभारण्यात आलेल्या नवीन सुरवाडे एजी फिडरचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या २४ सप्टेंबर २०२६ पासून विचवे, सुरवाडे बु. आणि सुरवाडे खुर्द या गावांतील शेतीचा वीजपुरवठा नवीन सुरवाडे एजी फिडरवरून सुरू करण्यात येणार आहे, तर शिंदी, मानमोडी आणि मोंढाळे या गावांतील शेतीचा वीजपुरवठा पूर्वीप्रमाणे जुन्या शिंदी एजी फिडरवरून सुरू राहणार असल्याची माहिती सहाय्यक अभियंता शिंदी वितरण केंद्र यांनी दिली आहे.

तर शिंदी, मानमोडी आणि मोंढाळे या गावांतील शेतीचा वीजपुरवठा पूर्वीप्रमाणे जुन्या शिंदी एजी फिडरवरून सुरू राहणार आहे.

नवीन फिडरमुळे शेतीपंपांच्या वीजपुरवठ्यात होणारे ट्रिपिंग, ब्रेकडाऊन तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीपिकांना वेळेवर पाणी देणे अधिक सुलभ होणार असून, वीजपुरवठ्यात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

नवीन फिडर उभारणीच्या कामादरम्यान विविध अडचणींचा सामना करावा लागला. कामाच्या अनुषंगाने अनेक वेळा वीजपुरवठा बंद ठेवावा लागला. मात्र, शेतकरी वर्गाने दिलेल्या सहकार्यामुळे हे काम अखेर पूर्णत्वास गेले आहे.

या पार्श्वभूमीवर सर्व शेतकरी बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, नवीन फिडर उभारणीसाठी सहकार्य करणारे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी, एनसीसी कर्मचारी, ठेकेदार तसेच लेबर वर्ग यांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.